महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या दाव्याने भाजप आमदार लक्ष्मण पवारांची उमेदवारी धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 06:24 PM2024-10-10T18:24:29+5:302024-10-10T18:25:04+5:30
विद्यमान आमदार असतानाही लोकसभेत लिड देण्यात भाजप आमदारास आले होते अपयश; आमदार असतानाही लक्ष्मण पवारांची उमेदवारी धोक्यात, तिकीटासाठी धावाधाव
बीड : भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या आणि त्यातही भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना गेवराई मतदार संघातून लीड देण्यात अपयश आले होते. सध्या गेवराईत जि.प.चे माजी अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मण पवार इतर पक्षांच्या संपर्कात राहून तिकीटासाठी धावाधाव करत आहेत.
लक्ष्मण पवार हे पहिल्यांदा २०१४ साली गेवराईतून आमदार झाले. त्यावेळी मतदार संघातील फारशी माहिती नव्हती, परंतू मोदी लाट आणि दोन्ही पंडित एकत्र आल्याचा मतदारांमध्ये असलेल्या रोषाचा त्यांना लाभ झाला. २०१९ मध्येही त्यांच्या विरोधात नाराजी होती. परंतू विजयसिंह पंडित यांचा निसटता पराभव झाला. यावेळी दोन पंडितांमध्ये मतांचे विभाजन झाल्याने पवारांची लॉटरी लागली. दोन वेळा आमदार होऊनही मतदार संघातील लोक नाराज आहेत. आजारी असल्याने ते काही महिन्यांपासून घरातच आहे. तसेच ग्रामीण भाग आणि कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचीही ओरड होते. या सर्व परिस्थितीचा आढावा पक्षाने घेतला. त्यामुळे त्यांचे यावेळी तिकीट कापण्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच मागील महिन्यात त्यांनी आपण कुटूंबातील उमेदवार देणार नाही, असे भाष्य केले. आज हे लक्ष्मण पवार तिकीटासाठी धावाधाव आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या भेटीगाठी घेत असल्याचे सांगण्यात आले. परंतू आगोदरची नाराजी पाहून त्यांना उमेदवारी मिळेल का? याकडेही लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडेंना लिड देता आली नाही
लोकसभा निवडणूकीत महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे उमेदवार होत्या. लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार असतानाही त्यांना मुंडे यांना लिड देता आली नाही. तब्बल ३९ हजार मतांनी पंकजा या पिछाडीवर होत्या. याचीही दखल पक्षाने घेतली आहे.
पवार कुटूंबातील हे दाेन नाव चर्चेत
पवार कुटूंबातील लक्ष्मण पवार यांचा पुतण्या शिवराज पवार आणि मोठे बंधू बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता पवार यांच्या नावाचीही विधानसभेसाठी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ते यांना पुढे येऊ देतात का? याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मतदार संघातील उद्घाटने हे शिवराज पवार यांच्या उपस्थितीत होत असल्याचे सांगण्यात आले.