गेवराई २०० खाटांचे कोविड केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:04+5:302021-04-18T04:33:04+5:30
गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी हे कोविड केंद्र सुरू केले. त्याचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. यावेळी अमरसिंह पंडित, ...
गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी हे कोविड केंद्र सुरू केले. त्याचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. यावेळी अमरसिंह पंडित, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी मान्यवर उपस्थित होते. या कोविड केंद्रात रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही, वर्तमानपत्र, मोबाइल चार्जिंग पॉइंट, वायफायसह चांगल्या दर्जाचे बेड, गादी व इतर सुविधा निर्माण केल्या आहेत.
गोदावरी नदीला आलेला महापूर असेल किंवा इतर संकटकाळी शारदा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून आजवर जनतेला मदत केली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा आरोग्य यंत्रणेला साहित्य व गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करू शकलो, कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता अतिशय कमी कालावधीत हे कोविड केअर सेंटर उभारताना रुग्णांना सुविधा मिळाव्यात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले, असे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, सहा. पोलीस निरीक्षक संदीप काळे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, आरोग्य विभागाचे डॉ. भारत नागरे, डॉ. शरद पवार, डॉ. आश्विनी देशमुख, अनिता निर्मळ, शीतल निसर्गंध आदींची उपस्थिती होती.