अट्टल गन्हेगार शहाद्याला ठोकल्या बेड्या, गेवराई पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:08 PM2018-07-10T17:08:20+5:302018-07-10T17:08:39+5:30
अखेर तो आहेर यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.
गेवराई : खून, दरोडा, लूटमार, बलात्कार, मारहाण असे विविध गुन्हे करण्यात तरबेज असलेला अट्टल गुन्हेगार शहाद्या उर्फ शहादेव विश्वास भोसले (२५ रा.नागझरी) याच्या सोमवारी रात्री मुसक्या आवळण्यात आल्या. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमने ही कामगिरी केली. मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या निशान्यावर होता. अखेर तो आहेर यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.
गतवर्षी चिंचगव्हाण येथील बाळासाहेब रावसाहेब उगले हे दुचाकीवरून पुण्याला जात होता. नागझरी फाट्याजवळ उगले यांना अडवून त्यांचा खून केला होता. या घटनेने जिल्हाभर खळबळ उडाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन व सध्याचे गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यावेळी या गुन्ह्याचा तपास केला होता. अवघ्या काही दिवसात गाड्या झरक्या चव्हाण याला बेड्या ठोकल्या होत्या. परंतु शहाद्या हा पोलिसांना गुंगारा देत होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
गेवराई तालुक्यातील रेवकी येथे शहाद्या आल्याची माहिती आहेर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या टिमसह सापळा लावला. रात्रीच्या वेळी पाऊस पडत असतानाही त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहाद्याविरोधात गेवराई, चकलांबा, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश आहेर, पोउपनि अरविंद गटकुळ, भूषण सोनार, पोना गणेश तळेकर, नवनाथ गोरे, शरद बहिरवाळ, हनुमान जावळे, एकनाथ कांबळे, अमोल खटाणे, दत्ता चव्हाण यांनी केली.
तर तो ना-यासोबतच पकडला असता
साधारण आठ ते दहा महिन्यांपूर्वी शहाद्याच्या टोळीतीलच नारायण पवार उर्फ ना-या याच्या रेवकी परिसरातच पावसात आहेर यांनी मुसक्या आवळल्या होत्या. यावेळी शहाद्या हा त्याच्या बाजूलाच म्हणजे काही अंतरावर झोपलेला होता. ना-या पकडताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते. हा प्रकार ना-याने चौकशीत सांगितला होता, असे सूत्रांकडून समजते.
गंगावाडीत वस्तीवर केले हल्ले
उगले यांचा खून करून पसार झाल्यानंतर काही दिवसांतच त्याने आपल्या इतर साथीदारांसह गेवराई तालुक्यातील गंगावाडी वस्तीवर नागरिकांवर हल्ले केले होते. त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली होती. शहाद्या रेवकीत आल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना कल्पना देऊन तात्काळ टिमसह सापळा लावला. यामध्ये तो अडकला. मागील अनेक वर्षांपासून तो आम्हाला हवा होता. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत होती. अखेर त्याला पकडण्यात यश आले.