गेवराई उपजिल्हा रूग्णालयात महिनाभरात २०० प्रसुतीचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:40 PM2019-11-01T18:40:22+5:302019-11-01T18:41:52+5:30
पाच वर्षांपूर्वी व्हायच्या केवळ सरासरी ९० प्रसुती
बीड : गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच एका महिन्यात तब्बल २०० प्रसुती झाल्या असून पैकी २५ सिझर आहेत. पाच वर्षांपूर्वी सरासरी प्रति महिना केवळ ९० प्रसुती होत होत्या. आता केज, परळी पाठोपाठ गेवराईनेही हे रेकॉर्ड तयार केले आहे. या टिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी गुरूवारी रात्री १२ वाजता जावून रूग्णालयात स्वागत केले. सुविधा अन् विश्वास वाढल्यानेच हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी पदभार सिवकारताच जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांचे रूपडे बदलून सुविधांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी केवळ केज व परळी उपजिल्हा रूग्णालयात एका महिन्यात २०० प्रसुती झाल्या होत्या. गेवराई उपजिल्हा रूग्णालयात २०१५ साली प्रति महिना सरासरी ९० ते ९२ प्रसुती होत असत. मात्र, सद्यस्थितीत हा आकडा २०० झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात २५ सिझर आणि १७५ नॉर्मल प्रसुती करून नवा विक्रम गेवराई उपजिल्हा रूग्णालयाने आपल्या नावे केला. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व टिमचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी गुरूवारी रात्री १२ वाजता रूग्णालयात जावून सत्कार केला. रात्री ११.४० वाजता वर्षा मोटे (२६ रा.ताकडगाव) या महिलेची २०० वी प्रसुती झाली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे, डॉ.जगदिश पोतदार, डॉ.अमोल पिंगळे, डॉ.संतोष मारकड, डॉ.श्रीगोपाळ रांदड, डॉ.गोविंद लेंडगुळे, डॉ.प्रवीण सराफ, डॉ.अब्दुल रौफ, परिचारीका प्रियंका खरात, स्वाती टाकळकर, भारत गाजरे, विद्या आहेरवाडकर, अंजना आगवान आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
रूग्णालयाचीही केली पाहणीरूग्णालयाची पुर्विची स्थिती आणि आजची स्थिती तुलनात्मक करून डॉ.थोरात यांना दाखविण्यात आली. तसेच सर्वसामान्य वॉर्ड, शिशु गृह, शस्त्रक्रिया गृह, महिला वॉर्ड, ओपीडीसह सर्व परिसराची डॉ.थोरात यांनी पाहणी केली. अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांनी सर्व माहिती दिली.
आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावू
चांगल्या कामासाठी शल्यचिकित्सकांचे नेहमीच सहकार्य असते. सामान्यांना तात्काळ आणि दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला होता, आणि तो पूर्ण करीत आहोत. आमच्या कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी सन्मान केल्याने माझ्यासह टिमचे मनौधैर्य वाढले आहे. यापुढे आणखी भरपूर विक्रम करून आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावून दाखवू.
- डॉ.राजेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, गेवराई
चांगल्या कामात सातत्य हवे
कामचुकारांवर तर नेहमीच कारवाया केल्या जातात. काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे काम खुप चांगले आहे. त्यांना प्रोत्साहन देणे सुद्धा माझे काम आहे. २०० प्रसुती करून त्यांनी विक्रम केल्याने स्वत: येऊन त्यांचा सन्मान केला. यात त्यांनी सातत्य ठेवावे.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड