घाटनांदूरच्या एसबीआय बँकेचे उद्दिष्टापेक्षा वाढीव पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:52+5:302021-07-23T04:20:52+5:30
घाटनांदूर : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व शासनाने नवीन व जुणे मिळून पीक ...
घाटनांदूर : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व शासनाने नवीन व जुणे मिळून पीक कर्ज वाटपाचे सहा कोटी पन्नास लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, बळीराजाची जाणीव असलेल्या शाखा व्यवस्थापक डॉ. शरद वर्मा यांनी लक्ष घालून गावोगाव शेतकऱ्यांच्या उंबऱ्यावर जाऊन दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप म्हणजे बारा कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करून नवीन विक्रम केला आहे. घाटनांदूर एसबीआय शाखेचा जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात दुसरा क्रमांक आहे.
शासनाने कर्ज माफी केली. मात्र, पुढे पीक कर्ज मिळेल की नाही, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करून बळीराजाला साथ दिली. येथील शाखा व्यवस्थापक डॉ. शरद वर्मा, उपव्यवस्थापक राकेश सिंग, मंदार देशपांडे, सचिन हिवरेकर, संतोष डहाळे आदींनी बँकेअंतर्गत असलेल्या नागदरा, आनंदवाडी, लेंडेवाडी, इंदिरानगर तांडा, मैंदवाडी तांडा, मैंदवाडी, पूस, तळणी, मुरंबी, चोथेवाडी, चंदनवाडी आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत गावातील मंदिराचा ओटा, चावडी आदी ठिकाणी बसून कागदपत्राची पूर्तता करून घेत पीक कर्ज प्रक्रिया राबविली.
उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे तब्बल बारा कोटी रुपयाचे प्रत्यक्ष पीक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना साथ देत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. जुने पीक कर्ज असलेल्या माफीत आलेल्या आठशे शेतकऱ्यांना तर नवीन शंभर अशा शेतकऱ्यांना बारा कोटी रुपये वाटप करून विक्रम केला आहे. आणखी प्रक्रियेत शेकडो खातेधारक असून अठरा कोटी रुपयांच्या वर वाटप होईल, अशी माहितीही शाखा व्यवस्थापक डॉ. शरद वर्मा यांनी ‘लोकमत’ला दिली. घाटनांदूर बँकेकडे दत्तक नसले तरीही शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले असून त्या व्यतिरिक्त गृह कर्ज, गायी, म्हशीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले. शासनाच्या आदेश व नियमानुसार अत्यंत पारदर्शीपणे कर्ज प्रक्रिया राबविण्यात आली, बँकेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामकाजात अडथळा येत आहे, असे डॉ. शरद वर्मा यांनी सांगितले.