दिग्गज नेते करणार आज शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:06 AM2019-10-03T00:06:43+5:302019-10-03T00:09:02+5:30
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त निवडत जिल्ह्यातील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर हे दिग्गज उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तर इतर मतदार संघातही पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे.
बीड : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त निवडत जिल्ह्यातील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर हे दिग्गज उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तर इतर मतदार संघातही पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे.
संपर्क, संवादातून मोर्चेबांधणी : रॅलीसाठी केले नियोजन
विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधी राष्टÑवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्याकडे रोहयो खाते आले. या चार महिन्याच्या कालावधीत मोर्चेबांधणी करत क्षीरसागर यांनी मतदार संघातील गावागावात भेटी देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच दुष्काळजन्य स्थितीमध्ये टंचाई निवारणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत बैठका आणि सामान्य मतदार, शिवसैनिकांशी संपर्क, संवाद करत आपली पकड मजबूत केली. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देत क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर गुरुवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीआधी क्षीरसागर समर्थकांकडून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.
भाजपा महायुतीचे परळीत शक्तिप्रदर्शन
परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शक्तिप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. शहरातील शिवाजी चौकातून रॅली काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सभा होणार आहे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
पवारांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे भरणार अर्ज
परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुरूवारी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवाजी चौक येथून प्रचार रॅली निघणार असून मोंढा मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.