21 वर्षांपूर्वी मंदिरात सोडून दिले; आता जन्मदात्यांना शोधण्यासाठी फ्रान्समधून परळीत पोहचली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:01 PM2024-02-26T20:01:13+5:302024-02-26T20:01:55+5:30
निर्दयी माय-बापाने चिमुकल्या मुलीला परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला. आता ती 21 वर्षांनंतर थेट फ्रान्सवरुन परळीत आई-वडीलांच्या शोधासाठी आली आहे.
परळी: मुलगी नको म्हणून अनेक निर्दयी पालक आपल्या चिमुकल्या मुलींना रस्त्यावर किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून जातात. अशाप्रकारच्या अनेक घटना देशभरात घडतात. बीड जिल्ह्यातील परळीमध्येही 20-21 वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. निर्दयी पालकाने आपल्या चिमुकल्या मुलीला वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला. आता तीच मुलगी 21 वर्षांनंतर थेट फ्रान्सवरुन परळीत आई-वडीलांच्या शोधासाठी आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, 8 जुन 2002 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिराचे तत्कालीन लेखापाल विनायकराव खिस्ते यांना टोपलीमध्ये ठेवलेले लहानगे बाळ दिसले. त्यांनी त्या बाळास परळी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या सहकार्याने बाळाला पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रम आणि पुढे जून 2002 रोजी पुण्यातील प्रीतमंदिर संस्थेत दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला गार्डियनशीप पीटिशन अन्वये फ्रान्सच्या एका दांपत्यास दत्तक देण्यात आले.
आता 21 वर्षांनंतर ती मुलगी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी थेट फ्रान्सवरुन परळी येथे आली आहे. नेहा आसांते असे तिचे नाव आहे. नेहा मोठी झाल्यानंतर आसांते कुटुंबाने तिला तिच्या लहानपणीची सर्व माहिती दिली, त्यानंतर ती आपल्या दत्तक आई-वडीलांसोबत खऱ्या पालकांच्या शोधासाठी परळीत पोहचली. आपले जन्मदाते आई वडील कोण, याचा शोध ती घेत आहे.
नेहाला स्थानिकांची मदत
बीडमधील वकील अंजली पवार या मुलीच्या मदतीसाठी धावून आल्या आणि त्यांनी 2020 पासून नेहाच्या पालकांच्या शोधकार्यास सुरुवात केली. त्यांनी अंबाजोगाईचे दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने विनायक खीस्ते यांचा शोध घेतला, त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड देखील शोधण्यात आले. मुलीच्या पालकांबाबत कुणास माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. आता नेहाच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.