छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात मृत्यूशी देत आहे झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:06 PM2019-04-07T16:06:50+5:302019-04-07T16:07:59+5:30
बीड तालुक्यातील अंथरवन पिंपरीतील घटना
बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. सध्या तिच्यावर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या वडिलांनी सदरील तरूणाविरोधात जबाब दिला आहे.
अंथरवण पिंप्री येथील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीची गावातीलच एक तरुण सतत पाठलाग करुन छेड काढत असे. मुलीचे आई- वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. दहा दिवसांपूर्वीच ते गावी परतले आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी शौचासाठी म्हणून गेलेली मुलगी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला तेव्हा घराजवळीलच एका शेतात ती अत्यवस्थ स्थितीत आढळली. तिने विषारी द्रव प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यावर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुलीच्या वडिलांनी रुग्णालय चौकीत तरुणाविरुध्द जवाब दिला असून उशिरापर्यंत पिंपळनेर ठाण्यात नोंद झाली नव्हती.