बीडच्या जिल्हा रूग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:47 PM2019-01-22T16:47:39+5:302019-01-22T16:48:47+5:30
जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे.
बीड : येथील जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. मंगळवारपासून याला सुरूवात झाली. ‘मुलगी अवजड नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे’ असे समुपदेशन जिल्हा रूग्णलायातील परिचारीकांकडून केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुलींचा जन्मदर वाढण्याबरोबरच त्यांना मान, सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास परिचारीकांनी व्यक्त केला आहे. रूग्णालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत होत आहे.
स्त्री भू्रण हत्येसारख्या प्रकरणाने बीड जिल्हा बदनाम झाला होता. तर अनेक माता गर्भलिंग तपासणी करून मुलीचा जन्माला येण्यापूर्वीच गळा घोटतात. असे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. हाच धागा पकडून आणि जिल्ह्याची प्रतिमा उजळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता जिल्हा रूग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी १३ मुलींचे आणि त्यांच्या मातांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी डॉ.नितीन राठोड, डॉ.दिपाश्री मोराळे, मेट्रन विजया सांगळे, शकुंतला सुतार, रेखा जोशी, शारदा डहाळे, वनिता वखरे, सुषमा घोडके, माया दास, स्वाती देशमुख, विजयमला बुद्रुपे, अश्विनी ढास, स्वप्नाली पवार आदींची उपस्थिती होती.
स्वागतासाठी स्वतंत्र सजावट केलेली खोली
जिल्हा रूग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींचे आणि त्यांच्या मातांचे दररोज स्वागत केले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र सजावट केलेली खोली तयार केली आहे. शिवाय मुलीला नवीन कपडे, मातेला पुष्पगुच्छ आणि सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी पेढे वाटप केले जात आहेत.