सोयरीकीस नकार दिल्याने मुलीच्या आई-वडिलास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:56 PM2019-05-16T18:56:16+5:302019-05-16T19:01:57+5:30
मुलीच्या आई-वडिलास बेदम मारहाण करून मुलीस पळवून नेण्याची धमकीसुद्धा दिली
पाटोदा (बीड ) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीस लग्नासाठी मागणी घातली असता तिच्या आई-वडिलांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मुलाच्या चिडलेल्या कुटुंबीयांनी मुलीच्या आई-वडिलास बेदम मारहाण करून मुलींना पळवून नेण्याची धमकी दिल्याची घटना पाटोदा तालुक्यात मंगळवारी घडली.
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील शेतकरी त्रिंबक लक्ष्मण भवर यांची मुलगी सध्या प्रवरानगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिचे लग्न माज्या मुलासोबत लावून दे, अशी मागणी हौसराव बाबा खोटे याने केली होती. परंतु, मुलीचे शिक्षण सुरु असल्याने तिचे लग्न आत्ताच करायचे नाही, असे त्रिंबक यांनी हौसरावला सांगितले होते. त्यामुळे हौसरावला राग आलेला होता.
मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्रिंबक हे त्यांची पत्नी द्वारकाबाई यांच्यासह स्वत:च्या घरात बसले असताना हौसराव बाबा खोटे, इंदूबाई अरूण खोटे, महेश हौसराव खोटे, अरूण बाबा खोटे, विश्वनाथ बाबा खोटे आणि बबन बाबा खोटे हे सहाजण तिथे आले आणि तुझ्या मुलीचे लग्न माझ्या पोरासोबत करून दे, म्हणू लागले. त्रिंबक यांनी त्यास नकार देताच तुझ्या पोरीचे लग्न दुसरीकडे कसा करतोस ते पाहतोच असे म्हणत मुलींना पळवून नेण्याची धमकी महेशने दिली.
एवढ्यावरच न थांबता त्या सहा जणांनी घरात घुसून त्रिंबक आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. भवर दांपत्याचा आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या शेजाऱ्यांनी त्यांची आरोपींचा तावडीतून सुटका केली. या प्रकरणी सहाही आरोपींवर त्रिंबक भवर यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.