५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, दावणीला चारा द्या- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:45 AM2018-11-12T00:45:27+5:302018-11-12T00:45:49+5:30
शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. तालुक्यातील जवळबन येथील दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हक्काच्या मागण्यांसाठी शेतक-यांनी रस्त्यावर यावे. आपण अखेरपर्यंत साथ देऊ अशी ग्वाही दिली. प्रभू रामाचा आदर असल्याचे सांगून राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल; मात्र सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतक-यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले. तर यावेळी पूजा मोरे यांनी कारखानदारांनी व प्रशासनाने यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी लेखू नये असा इशारा देत शेतक-यांनी लाचारीचं जीवन जगणे सोडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. पोपळे, शर्मिला येवले, रसिका धगे यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्र माचे प्रास्ताविक कुलदीप करपे यांनी केले. या परिषदेस केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.