‘शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजारांची मदत द्या’- जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:11 AM2019-02-01T01:11:17+5:302019-02-01T01:11:27+5:30
शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळामध्ये खरीप व रबी हंगामात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. ते शेकापच्या मराठवाडा विभागीय दुष्काळी परिषदेत बोलत होते.
यावेळी आ. बाळाराम पाटील, माजी आ. गंगाधर गाडे, नामदेव चव्हा़ण, राजू कोरडे, बाळासाहेब घुंबरे, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, संग्राम तुपे, मोहन जाधव, विष्णू घोलप आदींसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळी परिषदेत बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात आहे. त्याचसोबत बीड हा जिल्हा मजुरांचा जिल्हा आहे, महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने या मजुरांच्या जिवावर आहेत. मात्र येथील नेत्यांनी या कामगारांनी राजकारण केले मोठे झाले, विविध पदे मिळवली परंतू मजुरांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढत आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सभागृहात आम्ही मागणी केली आहे, कोकणातून समुद्रात जाणारे पाणी मुंबईकडे वळवा व नाशिकचे पाणी मराठवाडा व प्रमुख्याने बीड जिल्ह्याकडे वळवा परंतू शासनाने ही मागणी गांभिर्याने घेतली नाही. या अधिवेशनात देखील ही मागणी लावून धरली जाईल. शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट मदत देण्यात यावी, व विमा कंपन्या बंद करुन थेट शेतक-यांना ७० हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. तसेच शेततळ््यांचे निकष बदलण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी आ.जयंत पाटील यांनी केली.
तसेच पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले शेकाप प्रसिद्धीसाठी काम करत नाही, तर शेतक-यांशी बांधिलकी असणारा हा पक्ष आहे. दुष्काळी परिस्थिती व शासकीय धोरणांमुळे शेती करणे कठीन झाले आहे. त्यामुळे यापुढे शेतीची कामे ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावीत, तसेच लागणोर बियाणे, खते ही मोफत देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. आ. बाळाराम पाटील, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, एस.व्ही जाधव यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अप्रत्यक्षरीत्या मंत्री पंकजा मुंडे यांना टोला
उसतोड मजुरांचा प्रश्न मांडणारे व सोडवणारे एकमेव नेते होऊन गेले ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. असा नेता पुन्हा होणे नाही, तसेच त्यांच्या पुण्याईवर राजकारण सुरु आहे. त्यांच्या पश्चात ऊसतोड कामगारांचे हाल होत आहेत. त्यांच्या मतावर राजकारण करणारे ऐषोआरामात फिरतात हे चित्र बदलले पाहिजे. बीडमधील घराणेशाहीला हाकलले पाहिजे, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता पाटील यांनी केली. तसेच सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीमागे येणा-या निवडणुकीत उभा राहण्याचे आवाहन देखील आ. जयंत पाटील यांनी केले.
मराठवाड्याला हक्काचे १६० टीएमसी पाणी द्या
पाऊस नसल्यामुळे मराठवाड्याचा वाळवंट झाला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राने गोदावरीचे पाणी आडवल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे मराठवाड्याला गोदावरी व कृष्णा खोºयातील हक्काचे १६० टीएमसी व अतिरिक्त ३०० टीएमसी पाणी देण्यात यावे तरच मराठवाड्यातील पाणीप्रश्न सुटणार आहे. पुढील काळात यासाठी शे.का.पक्ष जनांदोलन उभारु असा इशारा भाई एस.व्ही जाधव यांनी यावेळी दिला.