नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:40+5:302021-09-26T04:36:40+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई, केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे, मांजरा नदीपट्ट्यात प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई, केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे, मांजरा नदीपट्ट्यात प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन पीक विमाही जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे आणि सौताडा येथूनही आलेले पाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडावे लागल्याने मांजरा नदीला मोठा पूर आला आहे. परिणामी नदीकाठच्या शेतातही पाणी घुसून अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली.
केज, अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीचा आढावा घेतला. केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात सध्याची भयंकर पूरपरिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. मांजरा व गोदावरी नदीपट्ट्यातील नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांना शेतजमीन, शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रतिहेक्टर ५० हजार रुपये शासनाने सरसकट मदत करावी. १०० टक्के नुकसान झाल्यामुळे १०० टक्के विमा रक्कम देण्याबाबत विमा कंपनीस आदेश द्यावेत. राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पांदण रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा. घरांची पडझड झाली आहे त्याबाबतही तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
250921\img-20210925-wa0067.jpg
केज, अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांशी करताना काँगेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख.