'दावणीला चारा द्या'; चाऱ्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचा जनावरांसह रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:54 PM2019-08-28T15:54:15+5:302019-08-28T16:01:23+5:30
दोन तासांच्या रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक ठप्प
अंबाजोगाई (बीड ) : शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्या. या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. दोन तास झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी घटनास्थाळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी गेला. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. होता तो चारा सहा महिन्यापूर्वी संपला. आता पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसावर व पेंढीवरच चाऱ्याची मदार आहे. पाच हजार रुपये प्रतिटन दराने ऊस विकत घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतांना अशा स्थितीत चारा विकत घेणे मोठ्या जिकीरीचे काम झाले आहे. अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना विकत चारा घेणे परवडत नाही. अशी भीषण स्थिती असतांनाही प्रशासनाच्या वतीने चाराछावण्या सुरू झाल्या नाहीत. चाराडेपोही उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सर्व जलस्त्रोत निकामी झाले आहेत. जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत पशुधन सांभाळायचे कसे?
या चिंतेने विवश झालेल्या बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा व परिसरातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आपल्या जनावरांसह रस्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दावणीला चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. सलग दोन तास झालेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती उपलब्ध होताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाच्या वेळी बर्दापूर पोलिस ठाण्याच्या वतीन महामार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.