वेतन कपात न करता प्रोत्साहन, जोखीम भत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:15+5:302021-05-16T04:33:15+5:30
बीड : कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, प्रोत्साहन व जोखीम भत्ता देण्याऐवजी ...
बीड : कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, प्रोत्साहन व जोखीम भत्ता देण्याऐवजी एक ते दोन दिवसांचे वेतन कपात करून मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याच्या निर्णयाला बीडमध्ये परिचारिकांनी विरोध केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदनही दिले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत आरोग्य विभाग सर्वात पुढे होऊन लढा देत आहे. सण असो वा उत्सव कसलीही सुटी न घेता दिवसरात्र आरोग्य सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्यासह जोखीम भत्ता देण्याची गरज आहे. परंतू शासनाने ६ मे रोजी एक आदेश काढत एक ते दोन दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत बीडमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने या वेतन कपातीला विरोध केला. वेतन कपात न करता जोखीम भत्ता देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संगिता दिंडकर, शिला मुंडे, राजेंद्र औचरमल, जयश्री उबाळे आदींची उपस्थिती होती.