मेगा नोकर भरतीत ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या; केजमध्ये सकल ब्राह्मण समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:38 PM2018-12-07T19:38:43+5:302018-12-07T19:39:50+5:30
मेगा भरतीमध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के राखीव कोटा ठेवावा अशी मागणी करण्यात आली.
केज (बीड ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या मेगा भरतीमध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के राखीव कोटा ठेवावा अशी मागणी सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे एक निवेदन आज केज येथील सकळ ब्राम्हण समाजाने तहसीलदारांना सादर केले.
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील ब्राह्मण समाज शासनाच्या कोणत्याही आरक्षण प्रवर्गात मोडत नाही तसेच समाजास कोणत्याही शासकीय सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. ब्राम्हण समाज हा पुरोगामी महाराष्ट्राचा घटक असुन सातत्याने शासनासाला सहकार्याची भावना ठेवणारा व शिस्तप्रिय समाज आहे. समाजाने आजतागायत कधीही कायदा मोडला नाही किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवलेली नव्हती , ब्राह्मण समाजाचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र आरक्षित जागे नंतरही सर्व समाज खुल्या जागेतून भरती होत असल्याने गुणवत्ता असतानाही ब्राह्मण समाजातील युवकांना नौकरी मिळत नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या मेगा भरती मध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के कोटा ठेवण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या बाबतचे निवेदन शुक्रवारी केजचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्याकडे केज येथील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने देण्यात आले या निवेदनावर सकल ब्राह्मण समाजाचे धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर , श्रीराम शेटे , श्रीधर खोत , शिवराज मुथळे, राहुल औसेकर, अभिजीत शेटे, सुरज पैठणकर, व्यंकटेश महाजन,जयंत देशपांडे , सुमीत पत्की आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.