शिवसेनेला दे धक्का; माजी नगराध्यक्षांचा केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:19 PM2023-04-07T12:19:36+5:302023-04-07T12:40:34+5:30
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले
मुंबई/बीड - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी पक्ष बीआरएसने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर राव यांनी पक्षवाढीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले होते. आजीमाजी खासदार, आमदारांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण पक्षप्रमुखांनी दिले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख (BRS) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असतााच आता बीडचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. गोरे हे शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष होते.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेल्या मतांनी उलटफेर घडत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यामुळे, एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचा नव्या पक्षातील प्रवेश उत्सुकता वाढवणारा आहे. तर, नांदेडनंतर बीआरएसने आता बीड जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येते.
बीडचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे आणि ऊसतोड कामगारांचे नेते शिवराज बांगर यांनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. हैदराबाद येथील प्रगती भवन येथे हा जाहीर प्रवेश झाला. केसीआर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. तर, राज्यातील सहा विभागातील समन्वयकांच्या नावाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर लवकरच बीडमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. सोशल मीडियात एका व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांनी पक्ष प्रवेश केल्याचे जाहीर केले. तेलंगणात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. हा बदल करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ता घेणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाकडे देण्यात यावी. यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.