पाण्याकडे दिले, आता मातीकडे लक्ष राहू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:00 AM2017-12-06T01:00:34+5:302017-12-06T01:00:47+5:30
गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी केले.
गेवराई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्वरलू, शेकापचे विकास शिंदे, म. फउले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, अॅग्रो इनपुटचे राष्टÑीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, आष्टीचे दत्ता काकडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल, कृषी विक्रेता संघटनेचे सत्यनारायण कासट, अभिनेता डॉ. सुधीर निकम, जालन्याच्या सीता राम मोहिते, परसराम भगत, पत्रकार दिलीप खिस्ती, संयोजक गणेश बेदरे, महेश बेदरे उपस्थित होते.
मंगळवारी मृदा दिनाचा संदर्भ जोडत पोपटराव पवार यांनी मातीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विषारी औषधे, खतांचा मारा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. हरित क्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले परंतु, उत्पादकता खालावत आहे. शरीराप्रमाणे मातीचे आरोग्य जपावे. शेतांमध्ये रोटाव्हेटरने कष्ट कमी केले, पण जमीन खराब झाल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत गावात एकही व्यसनी व मधुमेहाचा एकही व्यक्ती नसला पाहिजे असा हिवरे बाजारने संकल्प केल्याचे सांगून आनंद मिळेल तेवढाच पैशाचा हव्यास करा, पीक पद्धती, खतांचे डोस याचा अभ्यास करा असे पवार म्हणाले. या वेळी सीता राम मोहिते यांनी आदर्श मार्केटिंगची सूत्रे स्पष्ट केली.
प्रास्ताविक गणेश बेदरे यांनी केले. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. उद्धव घोडके, डॉ. सुधीर निकम, डॉ. अशोक जाधव, ब्रम्हदेव सरडे, सचिन सारडा, विनोद नरसाळे, जुबेर पठाण यांना कृषी विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार देण्यात आले.
कपाशी नोव्हेंबरपर्यंतच
गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरु बी.व्यंकटेश्वरलू यांनी कापूस उत्पादकांनी समजुतदारपणाने घ्यावे. नोव्हेंबरपर्यंतच कपाशीचे पीक घेतले पाहिजे.
दीर्घकालीन वाण घेऊ नका, बीटीसोबत रिफ्युजी (नॉन बीटी) वापरावे, विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषी औषधे, खते वापरावीत असे आवाहनही कुलगुरुंनी यावेळी केले.