पिकांना जीवनदान, भर उन्हाळ्यात मांजरा धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:43 IST2025-03-19T13:40:51+5:302025-03-19T13:43:25+5:30
मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.

पिकांना जीवनदान, भर उन्हाळ्यात मांजरा धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : तालुक्यातील मांजरा जलाशयाच्या कालवा सल्लागार समितीने त्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 18 ) सायंकाळी 6 वाजता मांजराचे 4 दरवाजे 0.25 मीटर उंचीने उघडून 2 हजार 754 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा धरणाखालील नागझरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत पिकांच्या सिंचनासाठी 16.54 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील जमिनीवरील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भर उन्हाळ्यात पिकांच्या वाढीसाठीही याचा फायदा होणार आहे.
224.093 दलघमी साठवण क्षमता असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे 25 सप्टेंबर 2024 रोजी 100 टक्के भरले होते. या धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आज मितीस मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 107. 376 दलघमी एवढा आसून त्याची टक्केवारी 60.68 टक्के आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मांजराचे द्वार क्रमांक 1,3,4,व 6 हे चार वक्र दरवाजे 0.25 मिटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात डाव्या व उजव्या कालव्यातून प्रत्येकी तीन पाण्याची आवर्तने होणार आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत डाव्या व उजव्या कालव्यात एकूण 17 दलघमी एवढे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. व सध्या दोन्ही कालव्यात उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सुरू आहे.
तीन जिल्ह्यातील 18 हजार हेक्टर जमिन ओलिताखाली
मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील एकूण 18 हजार 223 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा 90 कि.मी. अंतर लांबीचा आहे. त्यातून 10 हजार 559 हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा 78 कि.मी. अंतर लांबीचा असून त्याअंतर्गत 7 हजार 665 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी मांजरा धरण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
अतिदक्षतेचा इशारा
मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे धरणा खालील नदीपात्रात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी आदेश काढून अती दक्षतेचा इशारा संबंधित अधिकारी व पोलीस अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती मांजराचे सहाय्यक अभियंता सुरज निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.