पुरस्काराने आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:16+5:302021-09-03T04:35:16+5:30
बीड : आमच्या कार्याची दखल लोकमतने घेतली, हाच आमच्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार होय, अशी उत्स्फूर्त भावना कर्तृत्ववान महिलांनी यावेळी ...
बीड : आमच्या कार्याची दखल लोकमतने घेतली, हाच आमच्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार होय, अशी उत्स्फूर्त भावना कर्तृत्ववान महिलांनी यावेळी व्यक्त केली.
संसार सांभाळून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मराठवाड्यातील ३० महिलांना बुधवारी, १ सप्टेंबर रोजी लोकमत वुमन ॲचिव्हर्स ॲवार्डने सन्मानित करण्यात आले. लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने लोकमत भवनात पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर, लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा व इव्हेंट हेड रमेश डेडवाल यांच्या हस्ते लोकमत ॲचिव्हर्स ॲवार्ड कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रात यशाची नाममुद्रा उमटविलेल्या पुरस्कारप्राप्त महिला आपल्या कुटुंबासोबत लोकमत भवनात दाखल झाल्या होत्या. यामुळे सोहळ्याला कौटुंबिक किनार आली होती. आपल्या परिश्रमावर यशाची मोहोर लागणार, पुरस्कार मिळणार, या विचाराने त्या आनंदित झाल्या होत्या. जेव्हा त्यांची नावे पुरस्कारासाठी घोषित केली जात होती, तेव्हा उपस्थित टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या कार्याला सलाम करीत होते. जेव्हा या महिला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत होत्या तेव्हा हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केल्या. त्यांचे पती, मुले या सोहळ्याचे प्रत्येक क्षण मोबाइल कॅमेऱ्यात टिपत होते. लगेच सोशल मीडियावर शेअर करीत होते. त्यास ‘लाईक’ मिळणे सुरू झाले की, ते एकमेकांना दाखवून आनंद व्यक्त करीत होते. पुरस्कारात ट्रॉफी, कॉफीटेबल बुक दिले जात होते. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणारे समाधान शब्दांतीत होते.