भर वस्तीत कारची काच फोडून पाच लाख रुपये लंपास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:27 AM2018-12-05T00:27:21+5:302018-12-05T00:27:50+5:30
गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरियल व्यावसायिक ईश्वरप्रसाद लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रु पये लांबविले. भरवस्तीत वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरियल व्यावसायिक ईश्वरप्रसाद लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रु पये लांबविले. भरवस्तीत वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
ईश्वरप्रसाद लोहिया यांचे प्रशांतनगर भागात बसस्थानकाच्या पाठीमागे दुकान आहे. सोमवारी त्यांच्या तिन्ही फर्ममधील जमा झालेली एकूण पाच लाखांची रक्कम बँक बंद झाल्यामुळे शेजारच्या दुकानदाराकडे ठेवली आणि घरी निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता दुकानाकडे आल्यानंतर त्यांनी ती रक्कम घेऊन पिशवीत गुंडाळून स्वत:ची गाडी क्र. (एमएच ४४ के २०००) मध्ये ठेवली आणि गाडी दुकानासमोरील परमीट रुमच्या भिंतीजवळ उभी केली. त्यानंतर लोहिया यांनी दुकानात येऊन स्लीप लिहिली व काही ग्राहकांना सामान देण्यासाठी थांबले. ही संधी साधून चोरट्यांनी गुलेरच्या साह्याने कारची डाव्या बाजूची मागची काच फोडली आणि पाच लाख रुपये घेऊन दुचाकीवरून पोबारा केला.
त्यानंतर लोहिया कारमधील रक्कम आणण्यासाठी नोकराला पाठविले असता त्याला काच फुटलेली दिसली आणि चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी लोहिया यांच्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, ही पूर्ण चोरी आणि चोरटे समोरील एका पतसंस्थेच्या कॅमेºयात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
चोरट्यांचे धाडस
ज्या भागात ही चोरी झाली ते ठिकाण बसस्थानकाजवळ असून येथे एक नामांकित बँक, पतसंस्था, लॉज आणि इतर महत्वाची व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. अशा ठिकाणी तब्बल अर्धा तास रेकी करून थोडावेळ वाट पाहून चोरट्यांनी गाडीची काच फोडली. अर्ध्या तासानंतर चोरी झाल्याचे सर्वांना कळाले.