गौरवास्पद ! धारूरच्या दुर्लक्षित किल्ल्याच्या प्रतिकृतीला पहिले बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 04:19 PM2020-11-19T16:19:34+5:302020-11-19T16:20:32+5:30
राज्याच्या राजधानीत युवकांच्या ग्रुपने धारूरचा ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती उभारली
धारूर : मुंबई येथे शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आयोजीत दुर्ग बांधणी स्पर्धेत धारूरच्या किल्ल्याच्या प्रतिकृतीची प्रथम क्रमांकावर निवड झाली. दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याची प्रतिकृती मातोश्री युवा समिती उभारली. उत्कृष्ट बांधणी असलेल्या या किल्ल्याची प्रतिकृतीही स्पर्धत अव्वल ठरल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे.
धारूर येथील ऐतीहासीक किल्ला हा मोगल साम्राज्यात महत्वाच्या स्थानी होता. यामुळे इतिहास प्रेमी आणि अभ्यासक यांचे या कडे लक्ष होते. मात्र, सर्वसोयी सुविधा आणि उत्कृष्ट बांधणी असणाऱ्या या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे मागील १० वर्षांपर्यंत दुर्लक्ष होते. नुकतेच किल्ल्याच्या दर्शनी भागाची डागडूजी झाल्याने हा किल्ला पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. दरम्यान, मुंबई येथे साहेब प्रतिष्ठानच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन व दिवाळीनिमित्त 'दुर्ग बांधणी स्पर्धा-2020' आयोजित करण्यात आली होती. यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. स्पर्धेचा विषय 'दुर्लक्षित किल्ले' असा होता. बोरिवलीमधील मातोश्री युवा समितीमधील युवकांनी स्पर्धेत सहभागी होत धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याची सर्व वैशिट्ययुक्त प्रतिकृती उभारली. स्पर्धेत सहभागी इतर १५ संघाने उभारलेल्या प्रतिकृती पाहिल्यानंतर परीक्षकांनी धारूरच्या किल्ल्याच्या प्रतिकृतीची प्रथम क्रमांकाने निवड केली.
प्रतिकृतीत ४० एकरवरील परिसर
धारूरचा किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे ठरवल्यानंतर समितीमधील सर्व १५ युवकांनी किल्ल्याबद्दल ऑनलाईन माहिती जमा करण्यास सुरुवात केली. तब्बल पाच आठवड्यांच्या अभ्यासानंतर प्रतिकृती उभारणे सुरु करण्यात आले. किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या चाळीस एकरमधील परिसर त्यांनी उभारला. ही प्रतिकृती 22 * 6 फुट जागेत उभारण्यात आली आहे. यात स्वप्नील हांदे, संकेत काटे, रोहन आंबेकर, निखील खोत आदींनी सहभाग घेतला.