प्रत्यक्ष गावात जाऊन चारा, पाण्याची माहिती घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:06 AM2018-12-26T00:06:24+5:302018-12-26T00:07:19+5:30
रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : टंचाईवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चा-याची पाहणी करावी, रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
दुष्काळी परिस्थितीतील विविध विषयाची टंचाई हाताळण्यासाठी पाणी ,गुरांना, चारा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील विश्रामगृहामध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रविण धरमकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिका-यांनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पाहणी करावी. नरेगाच्या अधिग्रहीत विहीरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसापर्यंपुरेल तसेच जिथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल त्या गावातील पाणी साठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद,किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी, असे ते म्हणाले.
गाळपे-याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यापर्यंत हिरवा चारा पुरेल, हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपे-यासाठी अधिग्रहीत केले आहे. या क्षेत्रात बाजरी,ज्वारी, मका या बियाणाची पेरणी करु न जनावरासाठी हिरवा चारा निर्माण करावा. किमान ५ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चा-यासाठी उपलब्ध झाल्यास चा-याची टंचाई भासणार नाही, असे ते म्हणाले.
रोजगार हमी योजनेवर मजुरांना काम उपलब्ध करुन दिल्यास स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबरच्या आत गावामध्ये ग्रामसभा घेऊन व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांचे प्रत्याक्षिकाव्दारे मतदान घेऊन त्याची जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुले वाटप झाले, शेततळयाचे दिलेले उदिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी १० विहीरीचे काम झाले तर येणा-या काळात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी शासनाने दिलेले उदिष्टे वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.