‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’वर जा अन् घर बसल्या घ्या किरकोळ आजारांवर मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 01:03 PM2020-04-30T13:03:30+5:302020-04-30T13:04:28+5:30
नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही वेब साईट तयार करण्यात आलेली आहे.
बीड : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून सुचना केल्या जात आहेत. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे जात आॅनलाईन औषधोपचार देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. घर बसल्या सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत नागरिक ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ या वेब साईटवर जावून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. किरकोळ आजारांसाठी ही सुविधा असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही वेब साईट तयार करण्यात आलेली आहे. देशातील प्रत्येक व्यक्तील घर बसल्या किरकोळ आजारांवर मार्गदर्शन आणि सल्ला दिला जात आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेळ ठरवून दिलेले असून महाराष्ट्रासाठी सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारापर्यंतची वेळ आहे. याच लोक त्यांच्याशी संवाद साधून उपचार घेऊ शकतात.
दरम्यान, सध्या लॉकडाऊन आहे. त्यातच सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घर बसल्या उपचार घेण्यासाठी ही वेब साईट अत्यंत लाभदायक आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही सुविध मागील काही दिवसांपासून सूरू केली असली तरी याचा सध्या मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आहे. तज्ज्ञ डॉक्टर या साईटवर उपलब्ध राहत आहेत. आरोग्य विभागाचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे. जिल्ह्यातील व्यक्तींनीही याचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन बीड आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कसा साधायचा संपर्क?
गुगलमध्ये ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही साईट उघडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. तो त्यात टाकून पुढे आपले पूर्ण नाव, वय, जिल्हा, राज्याची निवड करावी. त्यानंतर आपला आजार काय आणि काय मार्गदर्शन हवे, याबाबत बातचित करावी. आपल्या आजाराबद्दल सुरूवातीला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला औषधांची नावे येतात. ही सुविधा घरबसल्या उपचार घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.