बोकड चोरीचा संशय अन जमावाचा वस्तीवर हल्ला; जाळपोळीत एका वर्षाचा चिमुकला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 06:48 PM2021-09-27T18:48:11+5:302021-09-27T18:55:51+5:30
mob attack in parner Beed : वस्तीवरील लोक गावात तसेच शेतात चोरी करतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
पाटोदा (जि. बीड) : तालुक्यातील पारनेर येथे २५ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पारधी वस्तीवर जमावाने हल्ला केला. यावेळी साहित्याची ताेडफोड करून घरे पेटवून देण्यात आली. जमावाच्या या हल्ल्यात एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा ठाण्यात दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे.
पारनेर गावाजवळ पारधी समाजाची वस्ती आहे. या वस्तीवरील लोक गावात तसेच शेतात चोरी करतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी रात्री काही तरुणांचा जमाव वस्तीवर चालून आला. लाठ्या-काठ्यासंह केलेल्या हल्ल्यात भिवराबाई काळे यांची झोपडी पेटवून दिली, त्यामुळे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. यात भिवराबाई यांचा नातू मानू ऊर्फ सिद्धांत अरुण काळे (१) या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
भिवराबाई अभिमान काळे (६५), अभिमान काळे (७०) ,सगुना अरुण काळे, विद्या साईनाथ भोसले व ताराबाई, विद्या साईनाथ भोसले यांचा जखमींत समावेश आहे. यापैकी अभिमान काळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवराबाई अभिमान काळे यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा ठाण्यात बबन औटे ,बाळू औटे, बबन औटे, विनोद औटे, अशोक दहिवले, विष्णू औटे, युवराज औटे, विशाल औटे यांच्यासह एकूण दहा ते बाराजणांवर पाटोदा ठाण्यात ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोकड चोरीची पार्श्वभूमी
पारनेरमधील घटनेला बोकड चोरीच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. चार दिवसांपूर्वी भगवान औटे यांचे बोकड चोरीस गेले होते. पारधी समाजाच्या एका तरुणावर चोरीचा आरोप झाला होता. यातून औटे यांच्यावर तरुणाने चाकूने हल्ला केला होता. यामुळे ग्रामस्थांनी संतापाच्या भरात वस्तीवर हल्ला चढविला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी पारनेरमध्ये तळ ठोकला.
परिस्थिती नियंत्रणात
पारनेरमध्ये वस्तीवरील लोक व ग्रामस्थांत सतत वाद होतात. त्यातून हल्ल्याची घटना घडली. यात एका बालकाचा मृत्यू झाला. दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद केला असून सातजणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुुरू आहे. गावता पुरेसा बंदोबस्त आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.
हेही वाचा - माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर