देव आणि वेद आनंदातच सामावलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:42 AM2019-01-20T00:42:58+5:302019-01-20T00:43:26+5:30
प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले.
बीड : प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले.
जीवन विद्या मिशनच्या वतीने शहरातील धानोरा रोड येथील हनुमान मंदिरात आयोजित समाज प्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महोत्सवाचा शुक्र वारी समारोप झाला. कार्यक्र मात तोत्रे यांनी जीवनातील आनंद यावर प्रबोधन केले. प्रारंभी पत्रकार दिलीप खिस्ती, इसाक शेख, अॅड. रघुराज देशमुख, कुलदीप धुमाळ यांच्य्यांनी दीपप्रज्वलन केले.
पुढे तोत्रे म्हणाले की, आनंद वाटण्यासाठी आपला जन्म झाला आहे, हे माणूस विसरत चालला. सृष्टीमधील प्रत्येक वस्तू आपल्याला काही ना काही देत असते. त्यानुसार माणसानेही द्यायला शिकावे. मानवी शरीरात परमेश्वराचा अंश आहे हे आपण विसरलो आहोत. शरीरात अहंकाराने जागा मिळविल्याने माणसाचा राक्षस झाला आहे. द्वेष व मत्सरामुळे माणूस दु:खी होत आहे. जीवनात कृतज्ञ राहणे हीच खरी उपासना आहे. आनंदी जीवनासाठी सदगुरु वामनराव पै यांनी दिलेली विश्व प्रार्थना रोज करा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या दिव्य संदेशानुसार आचरण करा, असा संदेश संतोष तोत्रे यांनी दिला. यावेळी संतोष तोत्रे यांनी २१ अनुग्रह दिला. कार्यक्रमास अजित सावंत, डॉ.किरण सवासे, डॉ. रोहिणी सवासे, प्रकाश गायकवाड, सुनीता गायकवाड, सुवर्णा चव्हाण, बापू सवासे, गणेश भोसले, गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.