गोदावरी, सिंदफणा काठच्या गावकऱ्यांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:13+5:302021-09-11T04:34:13+5:30
पुरुषोत्तम करवा/ लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : यावर्षी दमदार पावसामुळे पैठणचे धरणही ५० टक्क्यांहून अधिक भरले आहे. माजलगाव धरणही ...
पुरुषोत्तम करवा/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : यावर्षी दमदार पावसामुळे पैठणचे धरणही ५० टक्क्यांहून अधिक भरले आहे. माजलगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने चार दिवसांपासून पाणी सिंदफना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मोठाले पाऊस अद्याप पडणे बाकी आहेत. यामुळे गोदावरी, सिंदफनेला मोठा पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
आणखी एक-दोन मोठे पाऊस झाल्यास पैठणच्या धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा मोठा विसर्ग होऊ शकतो. यामुळे सिंदफणा नदीसह गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही नदीकाठच्या २७ गावांच्या पुनर्वसन गेल्या ३० वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की, या गावच्या नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. पूर आल्यावर नदीकाठच्या गावात पाणी शिरत असल्याने त्या गावातील लोकांचे प्रशासनाला स्थलांतर करावे लागते. १९८९ साली अशीच परस्थिती उद्भली असताना २७ गावांत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना घराबाहेर काढून इतरत्र हलवावे लागले होते. यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. यामुळे तत्कालीन सरकारने गोदावरी, सिंदफणा नदीकाठच्या २७ गावांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु त्यानंतर अनेक वर्षे पूरपरिस्थिती निर्माण न झाल्याने पुनर्वसनाची प्रक्रिया रखडत पडली आहे. त्यानंतर २००६ साली पुन्हा अशीच परस्थिती निर्माण झाली होती. तरीही आजपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही. याला जबाबदार राजकीय नेतेमंडळीच आहेत.
...
सांडस चिंचोलीचे होते बेट तयार
नाथसागर व माजलगाव धरणातून एकाचवेळी पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या गावाला दोन्ही नदीचा वेढा बसतो. अशावेळी त्या गावचे बेट तयार होत असल्याने या गावाला सर्वाधिक धोका आहे. यामुळे पावसाळा आला की, या गावच्या नागरिकांची झोप उडते.
...
...या गावाचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित
रिधोरी, कवडगाव थडी, शेलगाव थडी, गव्हाण थडी, काळेगाव थडी, डुब्बा थडी, हिवरा, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, जयाकोची वाडी, मंजरथ, सांडस चिंचोली, सरवर पिंपळगाव, आबेगाव, छत्र बोरगाव, गंगामसला, सोन्नाथडी, सुरुमगाव, शुक्लतीर्थ लिंबगाव, गुंजथडी, आडोळा, खातगव्हान, मोगरा, पिंप्री खुर्द, या गोदावरी पात्रा शेजारील गावांचा समावेश होतो, तर सिंदफणा नदीपात्राशेजारील माजलगाव, मनूर, शिंपे टाकळी, लुखेगाव, ढेपेगाव, सांडस चिंचोली या गावांचा समावेश होतो.
....