सेल्फीसाठी धबधब्याच्या धारेपर्यंत जात स्टंटबाजी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:02+5:302021-09-11T04:34:02+5:30
अनिल गायकवाड/ कुसळंब : जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सौताडा येथील धबधब्यावर निसर्गाच्या होणाऱ्या रोमांचकारी अदाकारीचा आस्वाद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून ...
अनिल गायकवाड/
कुसळंब : जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सौताडा येथील धबधब्यावर निसर्गाच्या होणाऱ्या रोमांचकारी अदाकारीचा आस्वाद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटक गर्दी करू लागले आहेत. सेल्फी घेण्यासाठी धबधब्याच्या धारेपर्यंत जाण्याचे धाडस अनेक जण करीत आहेत. सामाजिक वनीकरण विभाग आणि पोलीस यंत्रणेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सौताडा परिसरात वृक्ष, वेली, विविध फुलांसह वनराईचे सुंदर हिरवेगार जंगल विस्तारले आहे. लगतच सुमारे तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचावरून जलप्रपात सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह, अहमदनगर आणि परिसरातील भागातून हौशी तरूण, मुला-मुलींच्या झुंडी येथे पहायला मिळत आहे. अनेक तरुण-तरुणी धारेच्या पाण्यापर्यंत जात सेल्फी घेण्याच्या नादात करीत असलेला स्टंट जीवघेणा ठरू शकते. येथील कड्यावर आणि अगदी टोकावर जाऊन बसणाऱ्या तसेच फोटोसेशन करणाऱ्या युवक-युवतींना वेळीच रोखण्याची गरज आहे. याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
..
वनविभाग नावापुरताच
सौताडा धबधबा परिसरामध्ये वनविभागाच्या वतीने मोठे जंगल विस्तारित झाले आहे. या ठिकाणी वनविभागाचे कार्यालय आहे. येथे एक वनमजूर आणि एक रोजगार हमीचा मजूर एवढेच दिसून आले. सेल्फी घेण्यासाठी मात्र पर्यटकांची गर्दी होती.
..