रूग्णसेवा करणाऱ्या 'दुर्गां'चा वॉर्डात जावून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 04:26 PM2021-10-09T16:26:28+5:302021-10-09T16:27:17+5:30
Navratri : जिल्हा रूग्णालयात परिचारीका, डॉक्टर, कक्षसेविकांचा सीएसकडून सत्कार
- सोमनाथ खताळ
बीड : ऊन, वारा, पाऊस असो वा इतर कोणत्याही अडचणींवर मात करत २४ तास रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कक्षसेविका व इतर सर्व महिला कर्मचाऱ्यांचा वॉर्डात जावून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. जिल्हा रूग्णालयात शनिवारी दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो. अशीच संकल्पना पहिल्यांदाच राबवून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जिल्हा रूग्णालयात कर्तव्यावर उपस्थित राहून सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कक्षसेविका, सुरक्षा रक्षक, नातेवाईक महिला, महिला रूग्ण यांचा वॉर्डात जावून सर्वांच्यावतीने प्रतिकात्मक काही महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यामुळे कर्तव्यावरील महिला कर्मचारीही भारावून गेल्या. पहिल्यांदाच आपला अशाप्रकारे सन्मान झाल्याने त्यांनीही आभार व्यक्त केले. यावेळी मेट्रन रमा गिरी, संगिता दिंडकर यांच्यासह परिचारीका, डॉक्टर, कक्षसेविका, सुरक्षा रक्षक, महिला रूग्ण, नातेवाईक यांची उपस्थिती होती.
नातेवाईक महिलांचाही सत्कार
सरकारी रूग्णालयाबाबत सामान्यांमध्ये गैरसमज असतात. परंतू विश्वास दाखवून रूग्णलयात येत उपचार घेतल्याने रूग्णांचे नातेवाईक असलेल्या महिलांचाही डॉ.सुरेश साबळे यांनी सत्कार केला. आमच्याकडून कायम प्रामाणिक सेवा देऊन रूग्णांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अश्वासनही त्यांनी दिले.
आमच्या भगिनींचा अभिमान
कोरोना असो वा इतर कोणतीही महामारी. आमच्या महिला अधिकारी, कर्मचारी २४ तास सेवेत असतात. कसलेही कारण सांगून सेवेत हलगर्जी करत नाहीत. दिवसरात्र कर्तव्य बजावून रूग्णसेवा करत आहेत. कोरोनासारख्या महामारीत कुटूंबापासून दुर राहून त्यांनी बजावलेली सेवा अविस्मरणीय आहे. नवरात्रोत्सवाचे निमित्ताने त्यांचा सत्कार केला. परंतू रोज सत्कार केला तरी त्यांच्या कार्याची परतफेड होऊ शकत नाही. आमच्या सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे, असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी व्यक्त केली.