गेवराईच्या सोने-चांदी व्यापाऱ्यास रस्त्यावर मारहाण करून लुटले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:05 AM2021-02-28T05:05:26+5:302021-02-28T05:05:26+5:30
गेवराई : शहरातील सोन्याचे व्यापारी तालुक्यातील मिरगावंहून बाजार करून आपल्या मोटारसायकलवरून गेवराईकडे येत असताना एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी ...
गेवराई : शहरातील सोन्याचे व्यापारी तालुक्यातील मिरगावंहून बाजार करून आपल्या मोटारसायकलवरून गेवराईकडे येत असताना एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी अडवून मारहाण करत हातातील १०० ग्राम सोने व ४ किलो चांदी असा एकूण अंदाजे ७ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना २७ फेब्रुवारी दुपारी दीड वाजता दैठण-लुखामसला रोडवर घडली.
शहरातील समर्थ ज्वेलर्सचे मालक चंद्रकांत अंबादास उदावंत हे शनिवारी नेहमीप्रमाणे तालुक्यातील मिरगावं येथील बाजार (गुजरी) करून दुपारी दीडच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून गेवराईकडे येत होते. त्यांची गाडी दैठण ते लुखामसला रस्त्याच्या मध्ये असताना पाठीमागून मोटारसायकलवरून तोंड बांधलेले अज्ञात तीन जण आले व व्यापाऱ्याच्या पाठीत जोरात बुक्का मारत एकाने मोटारसायकलला जोराने ढकलून देत खाली पाडले. तोंडावर मारहाण करून जवळ असलेली सोन्या-चांदीची बॅग हिसकावून घेऊन मोटारसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या प्रकरणामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.