बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:03 PM2020-01-10T19:03:05+5:302020-01-10T19:07:31+5:30
या कमानीवर सोन्याचे विविध अलंकार लावण्यात आले आहेत
- संजय खाखरे
परळी: सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ना. धनंजय मुंडे यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत शहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठीक ठिकाणी कमानी उभारल्या आहेत, तर येथील सोनारलाइन रोडवर चक्क सुवर्ण अलंकार कमान उभारली आहे. या कमानीवर सोन्याचे अलंकार लावण्यात आले आहेत अशी माहिती सुवर्णकार समाजाचे नेते सुरेश टाक यांनी दिली
यापूर्वी परळीत १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते. मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत सोन्याची कमान लावून करण्यात येत असल्याने हे लक्षवेधी ठरत आहे. या कमानीवर सोन्याची एकदाणी, पट्टी गंठण, रानी हार नेकलेस, चैन पट्टी, माणिक-मोती गल सर असे अलंकार लावण्यात आले आहेत प्रत्येक अलंकार पाच तोळ्यांचा असून शहरातील सर्व सुवर्णकार बांधवांनी यासाठी सहकार्य केले आहेत. कमानीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत.
दीड क्विंटलच्या पुष्पहाराने होणार स्वागत
याशिवाय शहरात क्रेन द्वारे दीड क्विंटल वजनाचा पुष्पहार घालून ही स्वागत केले जाणार आहे.येथील मोंढा मार्केट भागातील हनुमान मंदिर परिसरात धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार होणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे याठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.