खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी
By अनिल भंडारी | Published: July 19, 2023 05:37 PM2023-07-19T17:37:18+5:302023-07-19T17:44:36+5:30
या मार्गावर विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे
बीड : अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वेमार्गाचे ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, अहमदनगर ते आष्टीपर्यंत ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे तर आष्टीपासून इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे.
सुमारे ४ हजार ८०५.१७ कोटी रुपयांचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा एकूण २६१.२५ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. या मार्गासाठी १८१४.५८ हेक्टर जमीन संपादित केली असून भूसंपादनाचे काम ९९.५३ टक्के झालेले आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६६.१८ किलोमीटरच्या अंतरात ७ रेल्वे स्थानके आहेत. यात अहमदनगर, नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा आणि आष्टी येथील स्थानकांचा समावेश आहे. आष्टी स्थानकापासून पुढे किनी, बावी, अंमळनेर, जाटनांदूर, इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम या वर्षभरात पूर्णत्वाकडे जाईल, अशी खात्री रेल्वे विभागाने दिली आहे. इग्नेवाडी ते परळी असे १२७.९५ किलोमीटरपर्यंतचे कामदेखील सुरू आहे. या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांचा रेल्वे संपर्क सुधारणार आहे.
Expediting Maharashtra's Rail Infra!
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 15, 2023
Ahmednagar-Beed-Parli New Line (261.25 km)
Est. Cost- 4805.17 Cr.
Total Stations-23
Work Completed- 66.18 km
Ahmednagar to Ashti
Near completion- 67.12 km
Ashti to Eganwadi
It will enhance Rail connectivity b/w Ahmednagar & Beed districts. pic.twitter.com/csyR1BSqfo
डेमू रेल तूर्त बंद
गतवर्षी सप्टेंबरमध्ये अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा सुरु केली होती. परंतु अवघ्या दहा महिन्यांत ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद, चालकांची कमतरता तसेच अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत या डेमू रेलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.