शुभवार्ता ! सीसीटीएनएस डाटा एंट्रीत बीड पोलीस राज्यात तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:33+5:302021-09-14T04:39:33+5:30
बीड: पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे. यात अभिलेख्यांची ...
बीड: पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे. यात अभिलेख्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. जुलै महिन्यात बीड जिल्हा पोलीस दलाने २२१ पैकी २०२ गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. यामुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.
सीसीटीएनएस प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहिती उपलब्ध होते. गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, तपास लावणे, वाहनांची पडताळणी करणे आदींसाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरते. सीसीटीएनएसमध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांपासून ते तपास, दाखल दोषारोपपत्रे आदी १८ प्रकारची माहिती अपलोड करावी लागते. त्याचा प्रत्येक महिन्याला गुन्हे अन्वेषण विभागाकडून आढावा घेतला जातो. गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर महासंचालक रितेश कुमार यांनी जुलै महिन्याचा अहवाल जाहीर केला. यात बीड पोलिसांनी २२१ पैकी डाटा एंट्रीत १३५, यशस्वी तपासात ५५ व ई-तक्रारींसाठी १२ असे एकूण २०२ गुण मिळवले. पोलीस अधीक्षक आर. राजा, नोडल अधिकारी तथा अपर अधीक्षक सुनील लांजेवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. नीलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर व सोनाली जाधव यांनी यासाठी परिश्रम घेतले तसेच ठाणे स्तरावरील सीसीटीएनएसच्या अंमलदारांचेही यात योगदान आहे.
...
सांगली अव्वल, परभणी, हिंगोली तळाला
सीसीटीएनएस डाटा एंट्रीत जुलैमध्ये सांगली जिल्ह्याने २२१ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला, तर कोल्हापूरने २१४ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. बीड व जालना जिल्हे २०२ इतके समान गुण घेऊन तृतीय आले. परभणी ९५, गडचिरोली ८९ व हिंगोली ७९ गुणांसह सर्वांत तळाला आहे.
....
यापूर्वी बीड अव्वलस्थानी
२०१९ मध्ये सीसीटीएनएसमधील अभिलेख्यांच्या नोंदीमध्ये बीड जिल्ह्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली चमकदार कामगिरी केलेली आहे. एकवेळा राज्यातून प्रथम तर नंतर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा सीसीटीएनएसच्या कामगिरीचा आलेख वर सरकल्याने जिल्हा पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जाते.
....
ऑनलाइन तक्रार अर्जांचा निपटारा, गुन्हे प्रकटीकरण व प्रतिबंध या त्रिसूत्रीवर सीसीटीएनएसचे कामकाज चालते. डाटा एंट्रीसह बेसिक कामावर भर दिला. शिवाय दररोज आढावा घेतला. यात ठाणे स्तरावरील तसेच सीसीटीएनएसच्या जिल्हा शाखेतील अंमलदारांचे मोलाचे योगदान आहे.
- सुनील लांजेवार, अपर अधीक्षक, बीड
....
130921\13bed_6_13092021_14.jpg
सुनील लांजेवार