गुड न्यूज! ललिताचा बनला ललितकुमार अन् झाला बाप; संक्रांतीच्या दिवशी प्राप्त झाले पुत्ररत्न

By सोमनाथ खताळ | Published: January 20, 2024 11:47 AM2024-01-20T11:47:31+5:302024-01-20T11:47:57+5:30

नको असलेल्या जीवनातून बाहेर पडलो, हाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट

Good news! Lalita after gender change Lalitkumar became a father; Boy bourn on the day of Sankranti | गुड न्यूज! ललिताचा बनला ललितकुमार अन् झाला बाप; संक्रांतीच्या दिवशी प्राप्त झाले पुत्ररत्न

गुड न्यूज! ललिताचा बनला ललितकुमार अन् झाला बाप; संक्रांतीच्या दिवशी प्राप्त झाले पुत्ररत्न

बीड : जवळपास २० वर्षे स्त्री म्हणून जगलो. या काळात मनात खूप घुसमट झाली. बाहेरून जरी स्त्री दिसत असलो तरी आतून मात्र पुरुष गुणसूत्रे असल्याने त्रास होत होता. अखेर शस्त्रक्रिया करून पुरुष झालो. पोलिस दलात त्याच पदावर आणि त्याच पोलिस ठाण्यात पोस्टिंगही मिळाली. परंतु ज्या मुलीने (पत्नीने) सर्वांचा विरोध जुगारून माझ्याबरोबर आयुष्य काढण्याचा निर्णय घेतला होता, तिला आई बनायचे होते. सुरुवातीचे दोन वर्षे कोणी काहीच बोलले नाही. परंतु नंतर चर्चा सुरू झाली. लग्न झाले आता लेकराबाळांचे पहा, कधी देणार गोड बातमी.. असे अनेक जण विचारत होते. त्यामुळे मनाला थोडा त्रास होत होता. अखेर या सर्वांच्या आशीर्वादाने सीमा गर्भवती राहिली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी १०:२१ वाजता आमच्या कुटुंबात नवा पाहुणा आला आणि आनंदाला पारावार उरला नाही. माझ्या संघर्षमय जीवनात महिला म्हणून जीवन जगलो, परंतु आता बाप म्हणून सर्वत्र वावरणार असल्याच्या भावना लिंग बदल करून पहिल्यांदाच बाप झालेले बीड जिल्हा पोलिस दलातील कॉन्स्टेबल ललितकुमार साळवे यांनी सांगितले. शुक्रवारी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी मोकळ्यापणाने मनातील भावना मांडल्या. बाप झाल्याचे सांगताना त्यांना आनंदाश्रू आले.

म्हणून सीमाचा लग्नाला होकार
ललितकुमार यांची पत्नी सीमा ही छत्रपती संभाजीनगरची रहिवासी आहे. त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ललितकुमार यांची पहिली शस्त्रक्रिया होताच सीमाकडे मागणी घातली. परंतु मुलीबरोबर कसे लग्न करणार? असे म्हणत सीमाने सुरुवातीला नकार दिला होता. त्यानंतर दोन शस्त्रक्रिया झाल्या. दरम्यानच्या काळात ललितला चार स्थळही आले होते. अशातच सीमा एका कार्यक्रमासाठी माजलगावला आली होती. तेथे ललितकुमार होते. यावेळी सीमाने पारखून पाहिले. त्यांच्यात महिलेचे कुठलेच गुण दिसले नाहीत. त्यानंतर चार महिने सीमाने यूट्यूब, बातम्या, व्हिडीओ सर्व काही इंटरनेटवर शोधले. अभ्यास केला. त्यानंतर तिला खात्री पटली आणि लग्नास होकार दिला.

आनंदात दोघेही रडलो अन् पहिला फोन आईला
सीमा गर्भवती असल्याचे समजल्यावर आम्ही दोघेही काही वेळ रडलो. आनंद शब्दात सांगता येणार नाही, एवढा झाला होता. आनंदाची पहिली बातमी आपण आई केसराबाई यांना सांगितली. तिलाही पुढील तीन महिने कोणाला सांगू नको, असे म्हणालो होतो, असेही ललितकुमार यांनी सांगितले.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अन् नातेवाईकांकडून शुभेच्छा
सीमा गर्भवती असल्याचे केवळ ललितकुमार आणि त्यांच्या आई केसरबाई यांना माहिती होते. परंतु २० नोव्हेंबर २०२३ ला बीडमधील पोलिस कॉलनीतच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. पोलिस कुटुंबासह नातेवाईकांची याला हजेरी होती. सर्वांनाच हे अश्चर्य वाटत होते. उपस्थित सर्वांनीच साळवे दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मुलाचे नाव ठेवणार आरुष
ललितकुमार यांच्या घरात आई केसरबाई, वडील मधुकर, बहीण अनिता, भाऊ दयानंद आणि धर्मानंद असा परिवार आहे. बहीण-भाऊ विवाहित आहेत. सर्व कुटुंब मजुरी करतात. ललितकुमार यांनी संघर्ष करून नोकरी मिळवली अन् कुटुंबाचा आधार बनले. आता त्यांच्या घरात मकरसंक्रांतीच्या दिवशी आणखी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याचे नाव सध्या तरी अंतिम झाले नाही, परंतु सर्वजण आरुष ठेवायचे म्हणतात, असे ललितकुमार यांनी सांगितले.

माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट...
मी लहानपणापासूनच स्त्री म्हणून जगलो. संस्काराप्रमाणेच वागलो. परंतु मला पुरुष असल्याची जाणीव होत होती. म्हणून माझी वैद्यकीय तपासणी केली आणि त्यात पुरुष गुणसूत्रे असल्याचे समजले. मग मलाही अश्चर्य वाटले. माझ्या मनात होत असलेल्या घुसमटचे कारण २०१४ साली समजले. त्यानंतर इंटरनेटवरून व इतर ठिकाणाहून माहिती घेत मी २०१७ साली लिंग बदल करण्यासाठी परवानगी नाकारली. मला जे जीवन नको होते, ते २०१८ ला पूर्ण झाले. मी पुरुष झालो, आणि घुसमट थांंबली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला, असे ललितकुमार म्हणतात.

बायकोचे सिझर अन् मी दरवाजात उभा
पोट दुखत असल्याने सीमाला छत्रपती संभाजीनगरला डॉ. पंडित पळसकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. सीमाचे सिझर करण्याचे ठरले. तिला रक्ताची गरज लागणार होती. त्यातही सीमाचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असल्याने चिंता होती. त्यामुळे मी शस्त्रक्रिया गृहाच्या बाहेर दरवाजातच उभा होतो. रक्ताचे नियोजन करण्यासोबतच सीमाचीही चिंता होती. परंतु सुदैवाने रक्त लागले नाही आणि प्रसूती सुखरूप झाली. डॉक्टरांनी आत बोलावून घेत मुलगा झाल्याचे सांगितले अन् मला आनंदाश्रू अनावर झाले. मी सर्वांना माहिती देऊन सर्व रुग्णालयात पेढे वाटले. गावाकडेही पेढे वाटले, भावांनी फटाके फोडल्याचे ललितकुमार यांनी सांगितले.

संकटात यांची झाली मदत
ललितकुमार यांनी अर्ज केल्यानंतर बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी तो महासंचालकांना पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा सकारात्मक विचार केला. विद्या चव्हाण, शस्त्रक्रिया करणारे डॉ. रजत कपूर, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. पंडित पळसकर, डॉ. रिंकू पळसकर, डॉ. शीतल यांच्यासह लोकमत आणि सर्व माध्यमांनी संकटात सहकार्य केल्याचे साळवे यांनी सांगितले.

सीमा रडली अन् आई संक्रांत सोडून धावत आली
मुलगा झाल्यानंतर सीमाला दाखविला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. तर ही बातमी आई केसरबाई यांना फोनवरून सांगितल्यावर तिला बोलताही येत नव्हते, एवढा आंनद झाला. तिने संक्रांतीचा सण सोडून तत्काळ आमच्याकडे धाव घेतली. आता सर्व नातेवाईक सीमाच्या जवळ आहेत. या आनंदात सासू चालूबाई बनसोडे असत्या तर आणखी आनंद झाला असता. आमच्या लग्नानंतर चार महिन्यांतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.

Web Title: Good news! Lalita after gender change Lalitkumar became a father; Boy bourn on the day of Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.