बीडमध्ये गुंडांचा हैदोस! टोळक्याची एकास बॅटने अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:05 IST2025-03-05T20:03:36+5:302025-03-05T20:05:31+5:30
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला निर्दयपणे बॅटने मारहाण केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बीडमध्ये गुंडांचा हैदोस! टोळक्याची एकास बॅटने अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बीड: जिल्ह्यात गुंडगिरीचे सत्र सुरूच असून, एका व्यक्तीला अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून टोळक्याने एका व्यक्तीस पकडून बॅटने मारहाण केल्याचे त्यात दिसत आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील बावी गावातील असल्याची चर्चा असून या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला निर्दयपणे बॅटने मारहाण केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही जणांनी पीडित व्यक्तीच्या आजूबाजूला उभे आहेत. एकाने त्याचे पाय पकडले असून एकजण पायावर बॅटने जोरदार फटके मारत आहे. मारहाण करणारे टोळके राजकीय पक्षाची संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा पद्धतीने अमानुष मारहाणीच्या या क्रूर कृत्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांत संतापाची भावना असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पीडित व्यक्ती कोण आहे आणि त्याला मारहाण का करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेने बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.