बीड, परळीच्या गुंडांची एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी
By सोमनाथ खताळ | Published: August 21, 2023 07:25 PM2023-08-21T19:25:11+5:302023-08-21T19:25:18+5:30
बीड पोलिस अधीक्षकांची एमपीडीएअंतर्गत कारवाई
बीड : बीड शहरासह तालुक्यात महिलांची छेड काढून पाठलाग करणारा गुंड आणि परळी शहरासह तालुक्यात बनावट दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या गुंडांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही गुंडांना बेड्या ठोकून त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस ठाण्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
शेख अख्तर शेख रशीद (वय ३०, रा. अचानकनगर, बीड) व पिंटू उर्फ सिद्धार्थ भगवान देवडे (वय ३८, रा. अशोकनगर, परळी) अशी या गुंडांची नावे आहेत. अख्तरविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणे, दुखापत करणे, विनयभंग करणे, महिलांचा पाठलाग करणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे, घरफोडी, चोरी, दुखापत करणे, रस्ता अडविणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिविगाळ करणे अशा प्रकारे तो गुन्हा करायचा. याच अनुषंगाने पेठबीडचे पाेलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी त्याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता.
दुसऱ्या प्रकरणात पिंटूविरोधात बनावट दारू तयार करून तिची विक्री करणे, ताब्यात बाळगणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे, शिविगाळ करणे अशा प्रकारचे सहा गुन्हे दाखल होते. त्याचा अहवाल परळी संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पाठविला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांना यांच्यावरील एमपीडीए कारवाईस मान्यता दिली. त्याप्रमाणे या दोघांनाही बेड्या ठोकून सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, संजय तुपे व त्यांच्या पथकाने केली.