एमपीडीए कायद्यांतर्गंत गुंडांची हर्सुल तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:55+5:302021-03-20T04:32:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नवगण राजुरी येथील विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या एकावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नवगण राजुरी येथील विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या एकावर एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाई करण्यात आली असून, त्याची रवानगी औरंगाबाद येथील हर्सुल तुरुंगात करण्यात आली आहे.
श्रावण गणपत पवार (रा. नवगण राजुरी, ता. बीड) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमळनेर येथील जबरी चोरी, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करणे, चोरी व यासह इतर गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग असून, विविध पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. विविध गुन्हे दाखल होऊनही वारंवार गुन्हे करण्याची मानसिकता असलेल्यांवर तसेच वाळू माफिया व हातभट्टीचालकांवर एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होत आहे. याच एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाई करण्याचा प्रस्ताव बीड ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १८ मार्च रोजी या प्रस्तावावर आदेश पारीत केले. त्यानुसार पवार याला ताब्यात घेऊन त्याची औरंगाबाद येथील हर्सुल तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील सहभाग वाढत असेल, वेळोवेळी गुन्हे दाखल होऊनही गुन्हे केले जात असलीत तर अशा आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येते. पुढील काळात मोठ्या प्रमाणात अशा कारवाया होतील, असे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.