अंबाजोगाईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:29+5:302021-04-06T04:32:29+5:30
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका ...
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाईत मुकुंदराज व्हॅली, नागनाथ मंदिर, बालाघाटाच्या डोंगर कपारीत असलेले बुट्टेनाथ मंदिर, रेणुका देवी मंदिर, दासोपंत समाधी, हत्तीखाना, सकलेश्वर मंदिर, डोंगर तुकाई मंदिराशेजारील धबधबा, ही अंबाजोगाईची ओळख आहे.
यासोबतच बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात नैसर्गिक सौंदर्य लपले आहे. मात्र दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळाचा विकास रखडला आहे. शहराच्या उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर डोंगतुकाई मंदिर आणि उंचावरून पडणारा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असून, ते दुर्लक्षित आहे. शहर व परिसरातील अनेक निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी रस्ता नाही. या परिसरात असणाऱ्या आकर्षक धबधब्याकडे आणि निसर्गरम्य स्थळांकडे जाण्यासाठी पक्का रस्ता झाला तर शेकडो नागरिक येथे जाऊ शकतील. या भागात ‘व्यूहपॉइंट’ निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरात अनेक जुने वाडे, विहिरी आहेत. संगीत आणि साहित्यावर जिवापाड प्रेम करणारे अनेक नागरिक आहेत. शैक्षणिक दृष्टीने शहर अग्रेसर आहे. शहरात विविध प्रकारांची वीस महाविद्यालये आणि चाळीस विद्यालये आहेत. अनेक संगीत मैफली, कवी संमेलने, समाजप्रबोधन करणारी व्याख्याने येथे होतात. विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुर्मिळ साहित्य, मंदिरांचे जतन व्हावे
येथील देशपांडे गल्लीतील देवघरात सर्वज्ञ दासोपंतांनी लिहिलेले ऐतिहासिक पासोडी आहे. तो दुर्मिळ साहित्याचा नमुना आहे. नागझरी परिसरातील महादेव मंदिराशेजारी दगडी गोमुखातून पाणी वाहते. बाजूला संत भगवानबाबांचे मंदिर आहे. शहरात योगेश्वरी देवी मंदिर, खोलेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, बडा हनुमान मंदिर, अमृतेश्वर मंदिर व इतर मंदिरे आहेत. खोलेश्वर मंदिरात दगडी शिलालेख आहे. बाजूला ऐतिहासिक शहाबुरूज दिमाखाने उभा आहे, या व अन्य पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी निवेदनात केली आहे.
विकासाचा अनुशेष भरून काढावा
अंबाजोगाई येथे पर्यटन केंद्र झाल्यास शहराचा विकास होईल.
शहराशेजारी असलेल्या या पर्यटनस्थळांचा विकास झाला, तर बेरोजगारांना रोजगार मिळेल. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील पर्यटनस्थळांच्या विकास रखडला आहे. पर्यटनस्थळांच्या विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी पर्यटनमंत्री आणि पर्यटन सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.