सरकारकडे सत्ता टिकविण्यासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:55+5:302021-09-11T04:34:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार घोषणांची अतिवृष्टी करीत असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी केली. आष्टी येथील निवासस्थानी पत्रकारांशी आमदार सुरेश धस यांनी संवाद साधला.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, तूर, उडिद, कांदा पिकांमध्ये पाणी साठले असून पिके सडू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच येणार नाही. जिल्ह्यातील ५० महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हा नुकसानग्रस्त भाग सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे. जिल्हाधिकारी म्हणतात पंचनामे करू. पंचनामे, ई-पीक पाहणी हे नाटक कशासाठी? ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडल्यास सरसकट नुकसान भरपाईसाठी क्षेत्र पात्र ठरते. जिल्हा प्रशासनाने नियम वाचण्याची गरज आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेला फिरतात. आष्टी तालुक्यातील सहा मंडलात अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार येथे भयानक परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण भरले नाही. बाकी सर्व १०० टक्के भरली आहेत. ५० मंडलांमधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे, असेही ते म्हणाले.
...
पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला
पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पीकविम्याचे मध्ये नाटक आणू नये. सरसकट सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, मिळालेच नसून, मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईल ‘टुंग’ वाजत आहे. या सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले, अशी टीकाही आ. धस यांनी यावेळी केली.