आष्टी येथील शासकीय कोविड सेंटर रामभरोसे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:33+5:302021-04-13T04:31:33+5:30
आष्टी : सध्या बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत आरोग्य यंत्रणा सुविधांअभावी कोलमडल्याचे विदारक ...
आष्टी : सध्या बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत आरोग्य यंत्रणा सुविधांअभावी कोलमडल्याचे विदारक दृश्य असून हे कोविड सेंटर रामभरोसे असल्याचे पहावयास मिळाले. आ. सुरेश धस यांनी भेट दिल्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आ. धस यांच्यासमोर विविध समस्यांचा पाढाच वाचला. आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याअनुषंगाने सद्य:स्थितीत शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोविड सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी रविवारी आ. सुरेश धस यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सदर सेंटरला भेट दिली; परंतु या ठिकाणची व्यवस्था ही रामभरोसे असल्याने कोविड सेंटर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असल्याची व्यथा कोरोनाग्रस्तांनी बोलून दाखवली. आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी व अधीक्षक यांच्या यंत्रणेचे वाभाडेच काढले.
याठिकाणी रुग्णसंख्या ही ३०० च्या पुढे असून केवळ ९४ बेडचीच सुविधा आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून एकही डाॅक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीला फिरकलाच नसल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यामुळे कुणाला काही त्रास आहे का? याची विचारपूस करण्याची कसलीच तसदी घेतली जात नसल्याचे यावरून लक्षात येत आहे. बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः या रुग्णांना जमिनीवर, चादरीवर झोपविण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले. शिवाय आरोग्य विभागाने बसविलेले आरओ प्लांटदेखील बंद आहेत. त्यातच या कोविड सेंटरमध्ये पहिल्यापासून बोटावर मोजता येतील एवढाच आरोग्य सेवकांचा स्टाफ असल्याचे दिसून आले; परंतु आम्हालाही कसल्याच प्रकारचे स्वसंरक्षणाचे कवच नसल्याने आम्हीदेखील हतबल असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि स्थानिक आरोग्य विभागाने समस्येचा पाढाच वाचून दाखविल्याने आ. सुरेश धस यांनी हे जर असेच सुरू राहिले तर जुने आणि नवीन रुग्ण एकत्रितपणे राहून बरे कसे होतील? असा सवाल उपस्थित करत कोलमडलेल्या आरोग्यसेवेवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही आरोग्य यंत्रणा माझ्या पद्धतीने हाताळून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगत या ठिकाणच्या रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देण्याचे काम केले.
अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? या कोविड सेंटरमध्ये पुरुष, महिला, युवक तसेच युवती कोरोनाग्रस्त म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांना एकाच हॉलमध्ये ठेवण्यात येत आहे. याबद्दल महिलांनी आ.धस यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. त्यामुळे महिलांना कसल्याच प्रकारचे संरक्षण नसल्याने आ.धस संतप्त झाले. त्यांनी तात्काळ तहसीलदारांची भेट घेतली. अशावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत महिलांना वेगळ्या कक्षात ठेऊन त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना केली.
===Photopath===
110421\3924img-20210411-wa0620_14.jpg
===Caption===
कोरोनाग्रस्त रुग्णांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आ.धस यांच्यासमोर विविध समस्यांचा पाढाच वाचला.