शासन आदेश धाब्यावर, ११ खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांना १२ लाखाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 12:36 PM2021-11-18T12:36:01+5:302021-11-18T12:36:49+5:30
- सोमनाथ खताळ बीड : कोरोना महामारीत खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांची अक्षरशा: लूट केली. लाखो रुपये जास्तीचे बिले घेऊन स्वत:चे ...
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना महामारीत खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांची अक्षरशा: लूट केली. लाखो रुपये जास्तीचे बिले घेऊन स्वत:चे उखळ पांढरे केले. यात जिल्ह्यातील ११ रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. त्यांनी १३ लाख रुपयांची जास्तीचे बिले घेतली होती. ते परत करण्याचे आदेश असतानाही आतापर्यंत केवळ ३३ हजार रुपयेच रुग्णांना परत केले आहेत. अद्यापही १२ लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे आता या रुग्णालयांचा परवाना रद्द करावा, वेळ पडली तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना मंगळवारी दिले आहेत.
कोरोना महामारीचा गैरफायदा घेण्यात खासगी रुग्णालये आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या बिलांपेक्षाही जादा बिले घेऊन रुग्णांची आर्थिक लूट केली. याबाबत काही तक्रारी वाढल्यानंतर शासनाने लेखा परीक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका पथकाकडून लेखापरीक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यातील ११ रुग्णालयांनी तब्बल १३ लाख १२ हजार रुपयांची बिले जादा आकारल्याचे उघड झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णांना ते पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. याबाबत सर्वच रुग्णालयांना ३० सप्टेंबर रोजी नोटीसही बजावली. परंतु तरीही या लुटारू रुग्णालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १३ लाखपैकी केवळ ३३ हजार रुपये रुग्णांना परत केले असून अद्यापही १२ लाख रुपये परत करणे बाकी असल्याचे उघड झाले. या गंभीर बाबीचा विचार करून आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना दिल्या आहेत. यामुळे आता लूटमार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.
... तर फौजदारी गुन्हा दाखल करा
वारंवार सांगूनही या खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना पैसे परत करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत जिल्हा शल्यचिकित्सकांना या रुग्णालयांचा नोंदणी रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
११ रुग्णालयांनी थकविलेल्या रकमेची यादी आणि कारवाईच्या आदेशाची प्रत मला मिळाली आहे. याबाबत आता नोंदणी रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू करणार आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून त्यांना अहवाल देणार आहे.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
कोरोनाबाधितांची लूटमार करणारे हेच ते ११ खासगी रुग्णालये:
रुग्णालयाचे नाव जादा आकारलेली रक्कम परत न केलेली रक्कम
सानप बाल रुग्णालय, बीड २९,२०० २९,२००
नवजीवन हॉस्पिटल बीड ४८,१२० ४६,४२०
दीप हॉस्पिटल, बीड १५३२१० १५३२१०
सूर्या हॉस्पिटल, बीड ४,००० ४,०००
धूत हॉस्पिटल, बीड १,१७,५२८ १,१७,५२८
संजीवनी हॉस्पिटल, बीड ६,६४,७७५ ६,६४,७७५
लाईफ लाईन नगर नाका, बीड १,१९,१८४ १,१९,१८४
आयडीयल केअर सेंटर, शिरूर ६४,५०० ६४,५००
कृष्णा हॉस्पिटल, बीड ३८,४०० ७,०००
आधार हॉस्पिटल, गेवराई ३१,६६० ३१,६६०
माउली हॉस्पिटल, पाटोदा ४१,२०० ४१,२००
एकूण १३,१२,५७७ १२,७८,६७७