'मदत देण्यासाठी शासनाचे आडमुठे धोरण'; तिरडी आंदोलनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:02 PM2021-10-12T18:02:17+5:302021-10-12T18:03:44+5:30
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.
गेवराई ( बीड ) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेसी मदत देण्यासाठी दिरंगाई होत असून याला शासनाचे आडमुठे धोरण जबाबदार असल्याचा आक्रोश करत शेतकरी संघटनेने आहे मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून संताप व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण उद्धवस्त झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पिके, जमीन पावसात वाहून गेली. त्यामुळे हतबल शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. तरी देखील राज्य सरकार याची कसलीच दखल घेत नाही. शेतकऱ्याचे एवढे नुकसान झाले तरी देखील शासन कुठलीच नुकसान भरपाईची घोषणा करत नाही. पिक विमा मिळत नाही असा संताप मंगळवार शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी व्यक्त केला.
दसरा मैदान ते शहरातील विविध मार्गावरून तहसील कार्यालयावर यावेळी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी करून आंदोलकांनी आक्रोश व्यक्त केला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रामेश्वर गाडे, सुभाष मायकर, अशोक हटवटे, अनुरोध काशीद, मिलिंद शिंदे, संपतराव कोथंबीर, मच्छिंद्र जगताप, परमेश्वर किशोरी यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.