ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 15:23 IST2020-09-28T15:22:55+5:302020-09-28T15:23:31+5:30
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल
बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वसामान्य जनतेची चाललेली परवड थांबवुन सरकारला तांत्रिक समस्या दूर करुन लोकांचे जीव वाचवण्यासाठी आदेशीत करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात सरकारची आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने लोकांचे हाल होत आहेत. दिवसेंदिवस बधितांचा आकडा व मृत्यूदर वाढत आहे. याला सरकारचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांची बेफिकीर वृत्ती कारणीभूत आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील आरोग्य यंत्रणेत कोणतीही सुधारणा होत नाही. तसेच राज्य सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात नाहीत. सामान्य माणसांवर पैशाअभावी उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओमप्रकाश शेटे यांच्याकडून जनहित याचिकेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली व सकारात्मक चर्चा केली. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.