कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:18 PM2023-09-04T19:18:21+5:302023-09-04T19:18:51+5:30
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट
परळी: जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन स्थळी झालेल्या अप्रिय घटनेनंतर परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास सोमवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती मंत्री मुंडे यांनी आंदोलकांशी केली.
यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की,मागील राज्य सरकारच्या काळात आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात संवैधानिक बाबींमध्ये निर्माण झालेल्या पेचामुळे टिकू शकला नाही, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच विचारांचे हे सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून व्यापक प्रयत्न करू, सरकारही सरकारची जबाबदारी 100% पार पाडेल.
जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे आरक्षणाची मागणी करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांवर पोलिसांमार्फत झालेल्या लाठीचार्जची घटना ही निषेधार्ह असून राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील या घटनेचा निषेध केलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अनेक सदस्य, विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.