'ग्रेडर एक, शासकिय खरेदी केंद्रे चार'; ग्रेडिंग करताना कापूस खरेदी केंद्रांवर शेतकर्यांची लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:06 PM2020-12-15T18:06:59+5:302020-12-15T18:07:42+5:30
केंद्रावर शेतकर्यांची लुट होत असताना सत्ताधारी-विरोधकांची बोलती बंद
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील पणन महासंघाच्यावतीने शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. सध्या चार जिनींगव्दारे कापसाची खरेदी करण्यात येत असून यासाठी केवळ एकच ग्रेंडर काम पाहत आहे. यात ग्रेंडरने चार ही खरेदी केंद्रावर खाजगी व्यक्ती नेमून कापसाची ग्रेंडीग करण्याची शक्कल लढवली आहे. मात्र, या खाजगी व्यक्तींकडून पिळवणूक होत असल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे. कापूस खरेदी केंद्रावर शेतकर्यांची लुट होत असतांना ही सत्ताधारी व विरोधकांची बोलती बंद आहे.
सुरूवातीला शासकिय कापुस खरेदी केंद्रे सुरू नसल्याने अनेक शेतकर्यांना खाजगी व्यापार्यांच्या दारात जावे लागले होते. व्यापाऱ्यांनी त्यांची अडवणूक करत कमी दर देवून लुट केली. शासनाने वराती मागुन घोडे ... या प्रमाणे तालुक्यात एक शासकिय खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर तीन जिनींगाना परवानगी दिली. आता एकूण चार खरेदी केंद्रातून कापुस खरेदी होवू लागली. शेतकर्यांनी आणलेल्या कापसाच्या दर्जाची प्रतवारी ठरवण्यासाठी प्रत्येक खरेदी केंद्रावर एक ग्रेंडरची नियुक्ती असणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील चार खरेदी केंद्राचा कारभार केवळ एकच ग्रेंडर हाकत आहेत.
नेमणूक असलेल्या येथील ग्रेडरने आगळी-वेगळी शक्कल लढवत चक्क चार ही खरेदी केंद्रावर खाजगी व्यक्तींना ग्रेडींगचे काम सोपवून उंटावरून कारभार हाकण्याचा उद्योग केला आहे. यात मात्र कापूस उत्पादक शेतकरी वेठीस धरल्या जात आहे. नेमणूक केलेल्या खाजगी व्यक्तींकडून कापूस घेवून आलेल्या शेतकर्यांच्या कापसात उणीवा शोधून कमी भाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काहीचा कापुस रिजेक्ट करण्यात येत आहे. यावर शेतकरी हतबल झाल्याचे खरेदी केंद्रावर दिसून येत आहेत. हे चित्र पाहून खरेदी केंद्रावरच गिरट्या मारणारे खाजगी दलाल या शेतकर्यांना ऐवढे पैसे द्या, तुम्हाला भाव मिळवून देतो असे म्हणून आर्थिक लुट केली जात आहे. यात शेतकर्यांचा चांगल्या दर्जाचा कापूस असतांना ही अडवणूक करत आर्थिक लुट केली जात आहे. या शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायायावर सत्ताधारी, विरोधक व शेतकरी संघटनाची बोलती बंद आहे.
व्यापारी दलालांचा कापूस थेट काट्यावर
माजलगाव तालुक्यातील शासकिय कापूस खरेदी केंद्रावर शेतकर्यांच्या कापसांचा दर्जा तपासून त्यात उणीवा शोधल्या जात आहेत. मात्र त्या ठिकाणी ग्रेडर व नेमलेल्या खाजगी व्यक्तीशी मिलीभगत करून व्यापारी दलालांचा कापुस प्रतवारी न ठरवता थेट काट्यावर नेण्यात येवून माप केले जाते.
आठ वर्षाचा अनुभव
माजलगाव तालुक्यातील मनकॉट या जिनींगवर असलेल्या शासकिय खरेदी केंद्रावर माझी नेमणूक ग्रेडर आनंद मोरे यांनी केली आहे. मला कापूस प्रतवारीचा मागील आठ वर्षाचा अनुभव आहे,
--मिटु कोटुळे, ग्रेडिंग करणारा खाजगी व्यक्ती
पणन महासंघाकडे मागणी
खरेदी केंद्रावर शासकिय ग्रेडर नेमण्यात यावा. याकरिता वारंवार पणन महासंघाकडे मागणी केलेली आहे. त्यांच्याकडून लवकरच ग्रेडर उपलब्ध करू असे सांगण्यात येत आहे.
- हरिभाऊ सवणे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव
खाजगी व्यक्तींना अनुभव
तालुक्यात चार शासकिय कापुस खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र या चार ही जिनींगवर ग्रेडर म्हणून एकवेव माझ्याकडे जवाबदारी आहे. मी एकटा कसा पुरणार, त्याकरिता खरेदी केंद्रावर खाजगी व्यक्ती नेमले आहेत. त्यांना प्रतवारीचा अनुभव आहे.
- आनंद मोरे, ग्रेडर