धान्य गोदाम तपासणीचा अहवाल आज होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:52 AM2019-03-12T00:52:25+5:302019-03-12T00:53:53+5:30
जिल्हा पुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते. ही तपासणी तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरु झाली सोमवारी व मंगळवारी तपासणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.
साधारण दोन वर्षापूर्वी एका प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागातील सावळा गोंधळ पाहून या वर्षाच्या मागील आठवड्यापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त होते. तरी देखील धान्य गोदामामधून होणारी चोरट्या पद्धतीने होणारी धान्य विक्री होत असल्याच्या तक्रारी येतच होत्या. बीडसह इतर काही गोदामांमधील १ महिन्याचे आगाऊ येणारे धान्य गायब असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. या सर्व गोष्टी आता तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने घोटाळा केलेले गोडाऊन कीपर व त्यासोबत सहभागी असणा-या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील २२ शासकीय धान्य गोदामांची तपासणी करुन ११ व १२ मार्च रोजी अहवाल सादर करण्याच्या सूचना पथकामध्ये सहभागी असणा-या तहसीलदारांना दिल्या आहेत. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे धान्याची शासकीय वाहनातून नियमित पुरवठा होत आहे का? तसेच गोदामातील अभिलेख अद्ययावत आहे का ? नोंदणीप्रमाणे धान्यसाठा आहे का ? या बाबींची तपाणी करण्यात येणार आहे सोमवारी काही गोदामांची तपासणी झाली असून आज उर्वरित गोदामांची तपासणी केली जाणार आहे व तपासणीदरम्यान काय आढळले याचा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालनंतर दोषींवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.