निवडणुकीला गालबोट, जुन्या वादातून फ्री स्टाइल हाणामारी, आमदार पुत्रासह ९१ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:35 PM2022-12-19T14:35:01+5:302022-12-19T14:36:39+5:30
शिराळमध्ये दोन गट समोरसमोर आले, त्यानंतर जुना वाद उफाळून आल्याने झाली फ्री स्टाइल हाणामारी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लावणारी घटना १६ डिसेंबरला घडली. जुन्या वादातून दोन गट समोरासमोर भिडले. परस्परविरोधी फिर्यादीवरून ९१ जणांवर आष्टी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पुत्राचाही यात समावेश आहे.
सचिन शत्रुघ्न आजबे (रा. शिराळ) यांच्या फिर्यादीनुसार, गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांच्यासह इतर दोघांना मारहाण केली. यावेळी खिशातील रोख रक्कम व दागिने काढून घेतले. यावरून संग्राम विलास आजबे, महेश चंद्रकांत आबे, आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुत्र यश, गणेश दत्तात्रय आजबे, ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांच्यासह इतर ५० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या गटाकडून ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संग्राम आजबे यांच्या खिशातील ५ हजार रुपये व सोन्याची चेन काढून घेतली. याबाबत संजय छत्रभूज आजबे, सचिन छत्रभूज आजबे, ज्ञानेश्वर विकास आजबे, सागर पंढरीनाथ आजबे, विनोद आजिनाथ रोडे, वृदेश्वर बबन आजबे व इतर ३० जणांवर गुन्हा नोंद झाला.
गावात तणावपूर्ण शांतता
हाणामारीचे कारण जुना वाद हे जरी असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वैराची किनार असल्याचे सांगितले जाते. शिराळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या गटात चुरशीची निवडणूक होती. गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर आष्टी ठाण्याचे पो. नि. सलीम चाऊस यांनी गावात भेट देत शांततेचे आवाहन केले. तपास उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.