ग्रामपंचायत निवडणुकीने दुरावली रक्ताची नाती; दुभंगलेली मने पुन्हा जुळणार का?
By अनिल लगड | Published: January 3, 2023 01:39 PM2023-01-03T13:39:16+5:302023-01-03T13:40:34+5:30
आता थेट ग्रामपंचायतींना निधी असल्याने गावपुढाऱ्यांसह खासदार, आमदारांनीही निवडणुकीत लक्ष घातले होते. अनेक ठिकाणी पुढाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
- अनिल लगड
बीड : जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या वातावरणात पार पडल्या. बहुसंख्य ग्रामपंचायतीत कार्यकर्ते पक्षीय असले तरी गावपातळीवरील आघाड्या स्थापन दुरंगी तिरंगी लढती झाल्या. थेट सरपंचपदासाठी निवडणूक असल्याने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरली. अनेक गावांत काही ठिकाणी नातेगोते, वैयक्तिक संबंधावरच निवडणुका लढल्या गेल्या, तर काही ठिकाणी सासू विरुद्ध सून, जावा-जावा, चुलत बहीण-भाऊ, अशा लढतीही या निवडणुकीत पाहायला मिळाल्या.
आता थेट ग्रामपंचायतींना निधी असल्याने गावपुढाऱ्यांसह खासदार, आमदारांनीही निवडणुकीत लक्ष घातले होते. अनेक ठिकाणी प्रतिष्ठित पुढाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. बहुसंख्य ठिकाणी जुन्यांविरुद्ध तरुणाई सरसावलेली दिसली. यात तरुणांनीच बाजी मारल्याचे चित्र समोर आले. निवडणुकीत पाण्यासारखा पैसादेखील खर्च झाला. त्याचा हिशोब जुळवताना अनेकांच्या नाकीनऊ आले. सरपंचाबरोबरच उपसरपंचपदाच्या निवडीही झाल्या आहेत; परंतु काही गावांमध्ये या निवडणुकीने एकाच घरामध्ये मोठी दरी निर्माण केली. नात्यानात्यांमध्येच निवडणूक झाली. यातील कोणी हरला कोणी जिंकला; पण त्यांची दुभंगलेली मने आता जुळणार का? हे भविष्यकाळच ठरविणार आहे.
रक्ताची नाते एकमेकांच्या विरोधात एक जाव जिंकली, एक जाव हरली
केज तालुक्यातील देवगावात सरपंचपदाची निवडणूक जावा- जावांत गाजली. मुंडे घराण्यात गेल्या ३० वर्षांपासून सत्ता आहे. १५ वर्षे रमाकांत मुंडे, ५ वर्षे त्यांच्या पत्नी उषा मुंडे, तर १० वर्षे पुतण्या अतुल मुंडे यांनी सरपंचपद उपभोगले आहे. या निवडणुकीत विक्रम मुंडे आणि रमाकांत मुंडे या सख्ख्या भावांच्या २ पॅनलसह १ अपक्ष असे ३ पॅनल निवडणुकीत उतरले होते. यात विद्यमान जि.प. सदस्य विजयकांत मुंडे यांची भावजयी आणि विद्यमान सरपंच अतुल मुंडे यांच्या पत्नी रूपाली मुंडे यांनी पूनम मधुर मुंडे यांचा ७० मतांनी पराभव केला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.
जावा-जावांना समान मते, एक चिठ्ठीवर विजयी
माजलगाव तालुक्यातील सुरूमगाव ग्रामपंचायतीसाठी अनिता गजानन माने-सिमिता अप्पाराव माने या जावा-जावात सदस्यपदासाठी निवडणूक झाली होती. या दोघींनाही समान मते मिळाली. यामुळे चिठ्ठी टाकून अनिता माने विजयी झाल्या.
भावकीत प्रेरणा पंडित यांची बाजी
गेवराई तालुक्यातील दैठण ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटात तगडी फाइट झाली. भावकी-भावकीत ही निवडणूक झाली. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांची कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीराव पंडित यांच्या सून प्रेरणा प्रताप पंडित या निवडून आल्या. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या शुभांगी नीळकंठ पंडित यांचा पराभव केला.
वारणीत सासू वर-चढ सून
शिरूर कारसार तालुक्यातील वारणी ग्रामपंचायतीत सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत सुनेने सासूबाईंचा पराभव केला. यापूर्वीही केदार घराण्यात सासू विरुद्ध सून अशी चार वेळा निवडणूक झाली आहे. आता पाचव्यांदा चुलत सासू-सुनात लढत झाली. पंचायत समितीच्या माजी सभापती बाबूराव केदार यांच्या पत्नी मंगलबाई पवार यांचा सून प्रियंका केदार यांनी पराभव केला.
राजकारणाने घरे फोडली
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय मुंडे हे विजयी झाले. दोन्ही मुंडेंचे अभय मुंडे चुलतभाऊ आहेत. अभय मुंडे यांनी दोघा बहीण-भावांचे बॅनरवर फोटो लावून प्रचार केला होता. मुंडे बहीण-भावांनी संगनमताने निवडणूक लढविली, तर बीड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले. त्यांच्या राजुरी गावात काका-पुतण्याच्या गटातील लढत चुरशीची झाली, तर अनेक गावांत ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले. यामुळे अनेक घराघरांत वाद, भांडणे झाली. यामुळे अनेकांची घरेदेखील दुभंगल्याचे चित्र दिसून आले.