ग्रामपंचायतची ७ पैकी ४ पदे एकाच घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:44 AM2018-01-06T00:44:53+5:302018-01-06T00:45:01+5:30
माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून, ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य म्हणजे लहूराव चाळक यांच्यासह दोन सुना व एक मुलगा ग्रामपंचायतचा कारभार हाकणार आहेत.
पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून, ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य म्हणजे लहूराव चाळक यांच्यासह दोन सुना व एक मुलगा ग्रामपंचायतचा कारभार हाकणार आहेत. एकाच घरावर रामपिंपळगाव येथील निष्ठा हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.
आजघडीला निवडणुकांमध्ये जागोजाग स्पर्धा पहावयास मिळत आहे. यासाठी अनेक ठिकाणी तणाव देखील दिसतो. मात्र माजलगाव तालुक्यात रामपिंपळगाव हे गाव हे एक चांगले उदाहरण ठरत आहे. येथील चाळक कुटुंबियांवर गावकºयांनी मोठी निष्ठा दाखवत एकाच घरातील चार उमेदवारांना ग्रामपंचायतवर विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. रामपिंपळगाव हे अवघ्या १२५ उंबºयांचे गाव असून, मतदार संख्या ४५० इतकी आहे. सदर ग्रामपंचायत ही बिनविरोध होऊन येथील लहूराव केशवराव चाळक हे सदस्य झाले असून त्यांची एक सून मनीषा महेश चाळक यांना सरपंचपदाचा मान मिळाला. दुसरी सून सुनीता उद्धव चाळक व मुलगा महेश लहुराव चाळक हे देखील सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महेश यांनाच ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली. आज गावोगाव पदासाठी भांडणे होताना पहावयास मिळतात. तसेच दोन भाऊ, दोन सुना एकमेकांसमोर निवडणूक लढताना दिसतात. मात्र रामपिंपळगावच्या ग्रामस्थानी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला असून ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक होताना दिसत आहे.
चाळक परिवारातील भगवानराव केशवराव चाळक हे सलग २५ वर्ष सेवा सोसायटीचे चेअरमन राहिले व त्यानंतर महेश लहूराव चाळक हे अडीच वर्ष चेअरमन होते. महेश चाळक यांनी उपसरपंचपदाचा कारभार हाती घेताच चेअरमनपदाचा राजीनाम देऊन दुसºयाला चाळक परिवाराने चेअरमनपदावर विराजमान केले.