मृत्यू प्रमाणपत्रासाठी तीन हजारांची लाच घेताना ग्रामसेवक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:52 PM2019-09-27T17:52:35+5:302019-09-27T17:55:35+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथील प्रकार
अंबाजोगाई - आजीच्या मृ्त्युप्रमाणपत्रासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडला.
तालुक्यातील सोनवळा येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याने ग्रामसेवक अनिल काशीनाथ रोकडे (वय - ५३) यांच्याकडे आजीचे मृत्यूप्रमाणपत्र काढण्यासाठी रीतसर मागणी केली. परंतु ग्रामसेवक हे प्रमाणपत्र देईनात. त्या शेतकऱ्याकडे ग्रामसेवक रोकडे याने ३ हजार रुपये लाच मागितली. या शेतकऱ्याने या घटनेची माहिती लाचलुचपत विभागाकडे दिली.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ग्रामसेवक त्यांच्या कार्यालयात येऊन बसल्यानंतर तो शेतकरी ३ हजार रुपये घेऊन ग्रामसेवकांकडे गेला. ग्रामसेवकांनी रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास सापळा रचून ताबयात घेतले. या कारवाईत राजकुमार पाडवी व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.